स्मार्ट मीटर सक्ती बंद

दुष्काळामुळे स्मार्ट मीटर सक्ती बंद करा; मनसेचे डॉ. नरसिंह भिकाने यांची महावितरणकडे मागणी

Smart Meter Sakti Bandh: जनता दुष्काळी परिस्थितीत चाचपडत असताना महावितरण वाढीव वीजबिल देणाऱ्या पोस्टपेड स्मार्ट मीटरची सक्ती निलंगा शहरात व संपूर्ण जिल्ह्यात करत असल्याच्या विरोधात..

दुष्काळामुळे स्मार्ट मीटर सक्ती बंद करा; मनसेचे डॉ. नरसिंह भिकाने यांची महावितरणकडे मागणी

Smart Meter Sakti Bandh

लातूर (Smart Meter Sakti Bandh) : जनता दुष्काळी परिस्थितीत चाचपडत असताना महावितरण वाढीव वीजबिल देणाऱ्या पोस्टपेड स्मार्ट मीटरची सक्ती निलंगा शहरात व संपूर्ण जिल्ह्यात करत असल्याच्या विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.‌नरसिंह भिकाने यांनी महावितरण अभियंत्याला धारेवर धरले. दुष्काळामुळे स्मार्ट मीटर सक्ती बंद करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

अदानी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीला एक लाख कोटींचे कंत्राट देऊन तुम्ही संपूर्ण ऊर्जा खाते अदानी समूहाला विकले आहे काय? असा सवाल विचारत निव्वळ अदाणीला मोठे करण्यासाठी हा स्मार्ट मीटरचा प्रपंच तुम्ही राबवत आहात व जनतेचा खिसा दुष्काळातही मारत आहात, असा आरोप डॉ. भिकाने यांनी महावितरण अभियंत्यावर केला आहे.

देशातील जनता जुन्या मीटरच्या माध्यमातून कमी बीजबिल भरून जगत होती, ती मरावी म्हणून अदानी स्मार्टमीटर जनतेच्या माथी जबरदस्ती मारले जात आहेत. त्यांना अशा उद्योपतींचा कोट्यवधींचा फायदा करून "देशातील जनता मरावी परी अदानी कंपनी जगावी" हे धोरण राबवायचे आहे. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे निर्लज्ज सरकारने यासाठी चक्क महावितरणचे कायदे सुद्धा बदलले आहेत. ज्यात वीज बिल न भरल्यास कुठलीही कल्पना न देता वीज पूरवठा तात्काळ बंद करणे, मीटर आमची मालमत्ता म्हणून जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवणे, बहुसंख्य ग्राहकांना वीजबिल दुप्पट येत असतानाही स्मार्ट मीटरच वापरावे लागेल, अशी अनेक निजामी वटहुकूम काढले आहेत. जेणेकरून अदानी स्मार्टमीटर देशभर घरोघर बसवताना आदानीला कुठलीही अडचण आली नाही पाहिजे व त्याचा डॉलर मध्ये फायदा झाला पाहिजे, असा आरोपही डॉ. भिकाने यांनी केला.

 भीषण दुष्काळातही तुम्ही जर जनतेला वेठीस धरून ग्राहकांची संमती न घेता असले खिसेकापू अदानी स्मार्टमीटर बसवणार असाल तर आम्हीही तुम्हाला सोडणार नाही. मनसेच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा सज्जड इशारा डॉ. भिकाने यांनी महावितरणला दिला. यावेळी जिल्हा सचिव प्रदीप शेळके, जिल्हा उपाध्यक्ष सूरज पटेल, तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, शहराध्यक्ष अबू बकर सय्यद, तालुका सचिव गणेश उसनाळे, तालुका उपाध्यक्ष बालाजी पवार, विकास सूर्यवंशी, सदाशिव हाडोळे, शिवराज चिंचोले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टैग्स: Smart Meter Sakti Bandh