जुने पारंपरिक मीटर पुन्हा बसविण्याची मागणी; १६ सप्टेंबरला वीज कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा
कोरची (Smart Meter Morcha) : कोरची शहर व परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये बसविण्यात आलेल्या नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप करीत वीज ग्राहकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे निवेदन सादविले. स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे पारंपरिक वीज मीटर पुन्हा बसवावेत, अशी प्रमुख मागणी नागरिकांनी केली आहे. (Smart Meter Morcha) स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वीच्या तुलनेत त्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ग्राहकांच्या बिलांमध्ये दोन ते चार पट वाढ झाल्याचा दावा करण्यात आला असून, प्रत्यक्ष वीज वापरामध्ये मोठी वाढ नसतानाही वाढीव बिले येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात स्मार्ट मीटर (Smart Meter Morcha) बसविण्यापूर्वीच्या वीज वापराची आणि त्यानंतरच्या वीज वापराची तुलना करून बिलांची फेरतपासणी करावी, वाढीव आकारणी दुरुस्त करावी तसेच संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती नागरिकांना लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत मागण्यांवर सकारात्मक व ठोस कार्यवाही न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या संबंधित कार्यालयावर वीज ग्राहकांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कोरची; तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, कोरची तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन कोरची यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना शालीकराम कराडे, निरिंगसाय मडावी, हिरामन मोहुर्ले, श्रीहरी मोहुर्ले, दामोधर कुंभारे, गजानन मोहुर्ले, अशोक मोहुर्ले, विनायक सलामे, गुरूदेव वाढई,परमेश्वर गन्गबोईर, अहिल्या सांडिल, मोहम्मद शेख, असलम शेख, लालु गोटा, झगरू मडावी, गयाबाई बागडे, गोपाल शेन्द्रे, गायत्री चटवा, शकुन्तला नैताम, यांच्यासह परिसरातील अनेक वीज ग्राहक व गावकरी यानी निवेदनावर सह्या केल्या आहेत. (Smart Meter Morcha) स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर नागरिकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे १६ सप्टेंबरच्या प्रस्तावित मोर्चाकडे आता प्रशासन व वीज वितरण कंपनीचे लक्ष लागले आहे.