उपविभागीय अधिकारी विकास माने यांची माहिती
वसमत (SIR Document Compilation) : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत वसमत विधानसभा मतदारसंघातील मतदारांना तांत्रिक विसंगती किंवा इतर कारणामुळे नोटीस आलेली असेल तर घाबरून जाऊ नका तुमच्या घरी बीएलओ पुन्हा एकदा येऊन कागदपत्रांची जुळवणी करून तुम्हाला मदत करतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी विकास माने यांनी दिली आहे
निरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या मतदारांपैकी काही मतदारांना नोटीस आलेले आहेत विशेषतांत्रिक विसंगती किंवा ‘नो जुळवणी’ नोटीस मिळालेल्या मतदारांना मतदार नोंदणी कार्यालयात सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची कोणतीही गरज नाही, नोटीस मिळालेल्या मतदारांची तारांबळ उडू नये म्हणून बीएलओ स्वतः मतदारांच्या घरी जाऊन पंचनामा, पडताळणी अहवाल व आवश्यक कागदपत्रे गोळा करतील. अशी माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मतदारांनी ऑनलाईन किंवा व्हॉट्सॲपद्वारे कागदपत्रे दाखल करण्यात आल्यानंतरही काही मतदारांना नोटीस झालेले आहेत अशा मतदारांसाठी दावे व हरकती सादर करण्याची मुदत आता १२ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संधीचा फायदा मतदारांनी घ्यावा, त्यासाठी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
दुर्बल आणि बेघर घटकांसाठी विशेष मदत कक्ष
अनाथ, बेघर, कामगार, आदिवासी व इतर असुरक्षित घटकांचे मतदान हक्क अबाधित राखण्यासाठी विशेष शिबिरे व मदत कक्ष उभारले जाणार आहे. नोटीस मिळाल्यास मतदारांनी घाबरून जाऊ नये नवमतदारांनी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरच्या विशेष शिबिराचा लाभ घेऊन १२ ऑक्टोबरपूर्वी आपली नावनोंदणी पूर्ण करावी.असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.