शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम

परभणीतील पूर्णा शहरात स्वच्छतेचा बोजवारा; शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम आक्रमक!

ShivSena Vishal Kadam: शहरातील ढासळलेल्या स्वच्छता व्यवस्थेचा निषेध करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष विशाल कदम यांनी बुधवार ३० सप्टेंबर  रोजी पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका

परभणीतील पूर्णा शहरात स्वच्छतेचा बोजवारा; शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम आक्रमक!

ShivSena Vishal Kadam

 

अधिकार्‍यांना चार दिवसांचा अल्टिमेटम; पालिका कार्यालयात टाकला कचरा

पूर्णा (ShivSena Vishal Kadam) : शहरातील ढासळलेल्या स्वच्छता व्यवस्थेचा निषेध करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष विशाल कदम यांनी बुधवार ३० सप्टेंबर  रोजी पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. शहरातील विविध भागांत जमा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून थेट पालिका कार्यालयाच्या आवारात आणत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. यावेळी पालिका अधिकारी व विभागप्रमुखांना धारेवर धरत शहरातील स्वच्छता व मूलभूत प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

शहरातील अनेक भागांत कचर्‍याचे ढीग, तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य आणि नियमित धूरफवारणीचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा का होत नाही, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.शहरातील रखडलेली विकासकामे, पालिकेतील कथित अनागोंदी कारभार तसेच नामांतरण, बांधकाम परवानगी, घरकुल आदी कामांसाठी नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा कदम (ShivSena Vishal Kadam) यांनी केला. नागरिकांकडून अवाजवी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींचीही त्यांनी दखल घेतली.

अस्वच्छतेमुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कार्यालयीन अधीक्षकांसह विविध विभागांच्या खातेप्रमुखांची कदम यांनी कानउघाडणी केली. चार दिवसांत स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासह नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी व रखडलेली कामे मार्गी लावावीत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला.

पालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांनी थेट संपर्क साधावा 
पालिकेशी संबंधित कोणतेही काम अथवा अडचण असल्यास नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. नागरिकांची पिळवणूक किंवा विनाकारण अडवणूक सहन केली जाणार नाही. पालिकेतील कामे नियमाप्रमाणे आणि विलंब न करता झाली पाहिजेत, अशी भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी मांडली.