मानोरा (Sant Sewalal Maharaj Samadhi) : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या वंशजांच्या समाधीसोबत छेडछाड करून विटंबना करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोहरादेवी येथे सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामांदरम्यान या समाध्या तोडण्यात आल्याची तक्रार महंत सुधाकर महाराज राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा प्रशासनाकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, पोहरादेवी येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास कामे सुरू आहेत. याच दरम्यान देवी सेवादास संस्थान, नोंदणी क्रमांक ६२५ शी संबंधित असलेल्या संत रत्नसिंग हरलाल सुखलाल महाराज यांचे उत्तराधिकारी व वंशज असलेल्या संतांच्या समाध्या (Sant Sewalal Maharaj Samadhi) असलेल्या परिसरात ही घटना घडली. ज्या समाध्या तोडण्यात आल्या त्यामध्ये संत परशुराम रत्नसिंग महाराज, संत आलसिंग रत्नसिंग महाराज, संत रंगराव रत्नसिंग महाराज, संत केसरसिंग रत्नसिंग महाराज, संत देवीसिंग रत्नसिंग महाराज तथा संत तुकाराम रत्नसिंग महाराज आदी समाधींचा समावेश आहे.
विकास कामाच्या नावाखाली या पवित्र समाध्या तोडून त्यांची विटंबना करण्यात आल्याने बंजारा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. (Sant Sewalal Maharaj Samadhi) याप्रकरणी जिल्हाधिकारी वाशिम तथा सार्वजनिक बांधकाम विभागाला* निवेदन देऊन या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आणि समाधीस्थळ व संबंधित संस्थानच्या संपत्तीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.