साईबाबा शुगरकडे ऊस बिले थकल्याची १५ शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार
लातूर (Saibaba Sugar Factory) : कारखान्याचा गळीत हंगाम होऊन सात महिने उलटले तरी औसा तालुक्यातील गोंद्री येथील साईबाबा शुगर कारखान्याने गाळपासाठी नेलेल्या उसाची बिले न दिल्याने ऊस उत्पादक १५ शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत या शेतकऱ्यांनी निलंग्याचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदने दिली आहेत.
तगरखेडा येथील बालाजी तात्याराव पाटील, भरत शेषेराव मोरे, बाबुराव वलांडे, माधव बेलोरे, सुरेश बळीराम थेटे, भगवान दादाराव थेटे, प्रवीणकुमार बब्रुवान थेटे, राजेंद्र ब्रह्माजी थेटे, मंगेश आप्पाराव डावरगावे, सुरेश काशिनाथ पाटील, माधव बाबुराव बेलोरे, बाबुराव वैजाप्पा वलांडे, गोपाळ व्यंकट संगमे, पूजा अर्जुन सगर, शहानवाज सत्तार मुल्ला, देविदास वसंतराव सोनाळे, अनिल शेषराव डावरगावे आदी शेतकऱ्यांनी सात दिवसांच्या आत रक्कम दिली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांना दिले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा यावेळी केली.
याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा शुगरने गेल्या हंगामात ऊस नेला होता. आता दुसरा गळीत हंगाम आलेला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पूर्णतः गारद झालेला आहे. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मानसिक आधार दिलेला आहे. मात्र गोंद्री येथील साईबाबा शुगर कारखाना शेतकऱ्यांच्या घेतलेल्या उसाचे पैसे द्यायला तयार नाही. कारखान्याचे शरण राजेश्वर पाटील व गणेश पाटील यांनी जानेवारी ते मार्च यांदरम्यान तगरखेडा येथील साधारणतः २० ते २५ शेतकऱ्यांचा ऊस घेऊन गेलेला आहे. मात्र त्याचे पेमेंट अध्यापक मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
काहींना थोडीबहुत रक्कम अदा केली...
आता साधारणतः सात महिन्याचा कालावधी लोटला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर व चेअरमन यांच्या घरी अनेकवेळा हेलपाटे मारलेले आहेत. काही शेतकऱ्यांना थोडी बहुत रक्कम अदाही केलेली आहे. तर काहींना एकही रुपया दिलेला नाही. ही रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सहसंचालकांची प्रतिक्रिया नाही...
दरम्यान याबाबत नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक साखर सौ. शुभांगी दौंड यांच्याशी संपर्क केला असता साईबाबा शुगर कारखान्याने गेल्या गाळप हंगामातील गळीत उसाचे पेमेंट सर्व संबंधित शेतकऱ्यांना दिल्याचा रिपोर्ट आपल्याकडे आला आहे, असे स्पष्ट केले. मात्र पंधरा शेतकऱ्यांनी निलंग्याच्या उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.