ग्रामस्थांची ग्रामपंचायतीकडे मागणी
मानोरा (Rui Village Theft Crime ) : मानोरा तालुक्याच्या शेवटचा टोक्यावर असलेल्या रुई गावामध्ये चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वाढत असून नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील प्रमुख ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणीचे निवेदन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना समस्त रुई ग्रामवासींनी दि. २८ सप्टेंबर रोजी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील मुख्य रस्ते, चौक, प्रवेशद्वार, सार्वजनिक ठिकाणे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे संशयित व्यक्तींची ओळख पटविणे व चोरीच्या घटनांचा तपास करणे कठीण होते. त्यामुळे गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, गावाच्या प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच आवश्यक त्या सार्वजनिक ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच सदर कॅमेऱ्यांचे नियमित देखभाल व रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात यावी.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास चोरीच्या घटना (Rui Village Theft Crime) रोखण्यास मदत होईल तसेच एखादी घटना घडल्यास संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्यास व पोलिस तपासास महत्त्वपूर्ण मदत होऊ शकते. तरी ग्रामपंचायतीने सदर विषयाची तातडीने दखल घेऊन गावाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही करावी, असे निवेदन समस्त ग्रामवासीयांनी ग्राम पंचायत प्रशासनाला दिले आहे.