धरणांच्या बुडीत क्षेत्रात नियमबाह्य विहिरी अन् अवैध पाणी उपसा;
प्रशासकीय उपाययोजना केवळ कागदावरच!
सतीश मांदळे
रिसोड (Risod Taluka Water Scarcity) : उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत मिळत असताना, प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांची लगबग मात्र केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात अवैध उपशावर कोणतीही धडक कारवाई अद्याप झालेली नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या लहान-मोठ्या धरणांमधून तसेच पाझर तलावांमधून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या पळसखेड धरणात सध्या केवळ ४.०८ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ही आकडेवारी प्रकल्पाच्या जलसाठ्याची तळाकडे सुरू असलेली वाटचाल अधोरेखित करत असून, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिक व शेतकरी वर्ग पूर्णपणे धास्तावला आहे.
पिंगळाक्षी देवी तलावाच्या बुडीत क्षेत्रात विहिरींचे खोदकाम
रिसोडचे ग्रामदैवत असलेल्या पिंगळाक्षी देवी तलावात मोठ्या संख्येने अवैध मोटारपंप सुरू आहेत. मागील (Risod Taluka Water Scarcity) पावसाळ्यात हा तलाव १०० टक्के भरला होता, त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासणार नाही अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, नियमबाह्य पाणी उपशामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने आटला आहे.
विशेष म्हणजे, काही व्यक्तींनी सिंचन तलावाच्या थेट बुडीत क्षेत्रातच मोठ्या आकाराच्या विहिरी खोदून ठेवल्या आहेत. या विहिरींमधून शक्तिशाली मोटारी व पाइपलाइन टाकून शेतीसह व्यावसायिक कारणांसाठी पाण्याचा अवैध उपसा रात्रंदिवस सुरू आहे. जिल्हा परिषद ल.पा. विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या तलावाच्या बुडीत क्षेत्रात विहिरी खोदण्यास परवानगी कोणी व कोणत्या नियमानुसार दिली, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळेझाक का करत आहे, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर
गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि गुराढोरांसाठी राखीव असलेला पाणीसाठा केवळ अवैध उपशामुळे संपुष्टात येत आहे. येत्या काही दिवसांत परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून धरणांमधील अवैध विद्युत पंप जप्त करावेत, बुडीत क्षेत्रातील विहिरींचा पाणी उपसा पूर्णपणे बंद करावा आणि संबंधित व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.