सार्वजनिक बांधकाम उपविभाग

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोरचीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

Public Works Sub-division: बिहीटेकला ते अल्लीटोला मार्गावरील कोमराटोला नाल्यावर सुरू करण्यात आलेले पुलाचे बांधकाम तब्बल गेल्या १५ वर्षांपासून अर्धवटच पडून आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोरचीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

Public Works Sub-division

 

१५ वर्षांपासून कोमराटोला नाल्यावर पूल अर्धवट; ग्रामस्थांचा निवडणूक बहिष्काराचा इशारा

कोरची (Public Works Sub-division) : सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोरचीच्या हलगर्जीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बिहीटेकला ते अल्लीटोला मार्गावरील कोमराटोला नाल्यावर सुरू करण्यात आलेले पुलाचे बांधकाम तब्बल गेल्या १५ वर्षांपासून अर्धवटच पडून आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. बिहीटेकला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या मार्गावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे, तसेच शाळकरी मुलामुलींना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा वेग वाढल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही ना आमदारांनी लक्ष दिले, ना खासदारांनी दखल घेतली, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत संतप्त ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुलाचे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू!” ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, निवडणुकीच्या तोंडावरच लोकप्रतिनिधी गावात येऊन आश्वासने देतात, मात्र निवडून आल्यानंतर गावाकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, असा ठाम पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये संताराम काटेंगे (कोमराटोला), रमेशाय तोफा, ताजीराम कुमरे, देवदास रामणाथ किरभोहीर, निकेश ढेक (बिहीटेकला), सबेलाल कोराम आदींसह दोन्ही गावांतील नागरिकांचा समावेश आहे. आता प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का, की पुन्हा एकदा ग्रामस्थांना आश्वासनांचीच फसवी झूल मिळणार?