कुरुंदा येथून गेली हा झाला परवलीचा शब्द
शेतकरी, जनता व उद्योजक त्रस्त ; कृषी पंपांना रात्री वीज
जवळा बाजार (Power supply interrupted) : येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा झाले असून नवनियुक्त अभियंत्यास वीज वितरणाचे काम जमत नसल्यामुळे दुसरा अभियंता येथे नियुक्त करावा अशी मागणी शेतकरी, जनता व उद्योजकांमधून होत आहे.
गावातील वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले असून नवीन डीपी मंजूर होऊन सुद्धा बसवण्याचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे वीज ग्राहकांना अत्यंत कमी दाबाने व खंडित स्वरूपात वीज मिळत आहे. २४ तासात सर्वाधिक वेळा वीज खंडित होण्याचा विक्रम जवळाबाजार येथे नोंदवला गेला आहे. वीज पुरवठा खंडित होण्याबद्दल एखादा पुरस्कार असल्यास जवळाबाजार येथील अभियंत्याचे या पुरस्कारासाठी नामनिर्देशन होण्यास हरकत नाही. गावातील उपलब्ध लाईनमनच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यात नवनियुक्त अभियंत्यास अपयश आले आहे.
गावाची अथवा कृषी पंपाची वीज खंडित झाल्यास कुरुंदा येथून वीजपुरवठा खंडित झाला हा परवलीचा शब्द ऑपरेटर, लाईनमन व सपोर्ट स्टाफच्या अंगी रुळला असून उद्योजकांना वीज पुरवठा होणार्या एक्सप्रेस फिडरची मात्र वीज कधीच खंडित होत नाही. मात्र सदर नवनियुक्त अभियंता रुजू झाल्यानंतर एक्सप्रेस फिडरची सुद्धा वारंवार वीज खंडित होण्यामुळे डॉ जयप्रकाश मुंदडा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्याम इंडस्ट्रीजचे गोपाल अग्रवाल यांनी बुधवारी वीज अभियंत्यास खडे बोल सुनावले. शासनाने कितीही घोषणा केल्या तरी येथील वीज उपकेंद्रातून कृषी पंपांना रात्री वीजपुरवठा होत आहे.
कुरुंदा येथील १३२ के व्ही वीज उपकेंद्रातून जवळाबाजार येथील ३३ केव्ही विज उपकेंद्राला वीज पुरवठा होतो. टाकळखोपा येथील १३२ के व्ही वीज उपकेंद्राचे काम सुरू झाले असले तरी हे केंद्र प्रत्यक्षात येण्यासाठी दोन वर्षाचा अवधी लागणार आहे. कुरुंदा येथून जवळाबाजार येथील वीज वाहिनीचे अंतर ७० किलोमीटर असल्यामुळे येथील वीज उपकेंद्रातील एका ट्रान्सफॉर्मरला हट्टा येथून कायमस्वरूपी जोडणी दिल्याशिवाय खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार नाही.