मानधानी येथील घटना; गंभीर जखमी बालकावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार
परभणी (Stray dog attack) : जिंतूर तालुक्यातील येथे मोकाट कुत्र्यांच्या झुंडाने तीन वर्षीय मुलावर हल्ला केला. यामध्ये सदर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानधानी येथे घडली.
या (Stray dog attack) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महादेव विलास जावडे हा मुलगा आपल्या घरासमोर खेळत होता. यावेळी गावातील ३ ते ४ मोकाट कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. चावा घेतल्याने मुलगा जखमी झाला. त्याच्या ओरड्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बाळू मुळे, संतोष पाडळकर, बंडू हरकळ, सुभाष मस्के यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. गंभीर महादेवला उपचारासाठी परभणीतील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बालकाचे वडिल मेंढपाळ असून घटनेच्या वेळी ते मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तर आई घरकामात व्यस्त होती. यावेळी मोकाट कुत्र्यांनी सदर मुलावर हल्ला चढविला. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.