15 सप्टेंबरला IPO खुला होण्याची शक्यता; 24-25 सप्टेंबरला लिस्टिंगचा अंदाज, शेअरची संभाव्य किंमत सुमारे 2,000 रुपये
मुंबई : देशातील आघाडीच्या शेअर बाजारांपैकी एक असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या बहुप्रतीक्षित IPOचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) NSE ला ऑब्झर्वेशन लेटर जारी केल्याची माहिती शुक्रवारी सेबीच्या वेबसाइटवर समोर आली. त्यामुळे सुमारे दशकभरापासून रखडलेल्या NSE च्या सार्वजनिक समभाग विक्री प्रक्रियेला आता पुढे जाण्याची परवानगी मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, NSE चा IPO 15 सप्टेंबरला बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 24 किंवा 25 सप्टेंबरपर्यंत शेअर बाजारात लिस्टिंग करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीकडून 26 सप्टेंबरपूर्वी लिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.
या IPOमध्ये NSE चे सुमारे 14.89 कोटी शेअर्स ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, एका शेअरची किंमत अंदाजे 2,000 रुपयांच्या आसपास निश्चित होऊ शकते. IPOचे अंतिम प्राइस बँड मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
NSE च्या प्रस्तावित इश्यूचे अंदाजे मूल्य 30,000 कोटी रुपये असल्याने भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठ्या IPOपैकी हा एक ठरणार आहे. या माध्यमातून NSE चे बाजारमूल्य भारतातील टॉप 10 कंपन्यांच्या श्रेणीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
NSE च्या IPOची तुलना मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रस्तावित IPOशीही केली जात आहे. जिओचा IPO सुमारे 37,700 कोटी रुपयांचा असण्याचा अंदाज आहे. मात्र जिओच्या इश्यूची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने, सध्याच्या माहितीनुसार NSE चा IPO आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरण्याची शक्यता आहे.
NSE चा प्रस्तावित इश्यू 2024 मधील ह्युंदाई मोटर इंडियाच्या 27,858.75 कोटी रुपयांच्या IPOला आणि 2022 मधील LIC च्या 20,557.23 कोटी रुपयांच्या IPOला मागे टाकू शकतो. याशिवाय Paytmचा 18,300 कोटी रुपये, Tata Capitalचा 15,511.87 कोटी रुपये आणि Coal Indiaचा 15,200 कोटी रुपयांचा इश्यूही NSE च्या प्रस्तावित IPOच्या तुलनेत लहान ठरतील.
NSE चे शेअर बाजारात लिस्टिंग होण्याची प्रक्रिया 2016 पासून कायदेशीर आणि नियामक अडचणींमुळे रखडली होती. आता सेबीकडून ऑब्झर्वेशन लेटर मिळाल्याने या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
दरम्यान, IPO Watch नुसार NSE चा शेअर ग्रे मार्केटमध्ये सध्या 285 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये शुक्रवारी NSE चा शेअर 1,975 रुपयांवर बंद झाला. या आधारावर ग्रे मार्केटमध्ये NSE शेअरची संभाव्य लिस्टिंग किंमत सुमारे 2,260 रुपये मानली जात आहे. मात्र अंतिम किंमत आणि प्राइस बँडची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होईल.