एक हजार १९७ अंगणवाडी केंद्रांवरील उपक्रमांची ऑनलाइन नोंद
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुंबईत होणार गौरव
हिंगोली (National Nutrition Month 2025) : राष्ट्रीय पोषण माह २०२५ अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील एक हजार १९७ अंगणवाडी केंद्रांवर राबविलेल्या विविध उपक्रमांची पोषणमाहच्या अधिकृत पोर्टलवरील जन आंदोलन डॅशबोर्डवर ऑनलाइन नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचे या यशाबद्दल कौतुक करत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (National Nutrition Month 2025) अंतर्गत दरवर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जातो. जिल्हाधिकारी गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून 2025 मध्ये अंगणवाडी केंद्रांवर लठ्ठपणावर नियंत्रण, साखर व तेलाचे सेवन कमी करणे, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण, पोषण भी पढाई भी, एक पेड मां के नाम, बालक व लहान मुलांसाठी पाककृती, आहार पद्धती तसेच पोषणविषयक जनजागृतीत पुरुषांचा सहभाग आदी विविध पोषणविषयक मार्गदशन, जनजागृती उपक्रम राबवून त्यांची ऑनलाइन नोंद जन आंदोलन डॅशबोर्डवर महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने घेतल्याचे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांनी सांगितले.
बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे, राजकुमार धापसे, सारिका सोरेकर, संगीता इंगळे, पुष्पा राठोड, विस्तार अधिकारी अविनाश डुकरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा समन्वयक शुभांगी पाटील, सहाय्यक जिल्हा समन्वयक वसीम पठाण यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याचेही ते म्हणाले.