गॅस रिफिलिंगचे २ अड्डे उद्ध्वस्त; ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा (Nandura Gas Refilling Action) : नांदुरा शहरासह परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर काळाबाजार आणि रिफिलिंग करणार्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांवर जिल्हा पुरवठा विभागाने आज बुधवार ३० सप्टेंबर रोजी धडक छापे मारले. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईत एकूण ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गॅसचा काळाबाजार करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार ३० सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नांदुर्यातील ताजनगर परिसरातील एका टिनाच्या शेडवर प्रशासकीय पथकाने अचानक छापा टाकला. या ठिकाणी गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर रिफिलिंग सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत गॅसने भरलेली टाकी, दोन नळ्या जोडलेली इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि टूल किट असा एकूण १२ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास परत नांदुर्यातील आठवडी बाजारातील शासकीय धान्य गोदामाच्या मागे दुसर्या ठिकाणी छापा मारण्यात आला. या ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंगसाठी साठवून ठेवलेल्या ६ गॅस भरलेल्या टाक्या, इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा व टूल किट असा २५ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मालक पसार, प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूदोन्ही घटनास्थळी तपासणीदरम्यान कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हती तसेच ठिकाणांच्या मालकांचा शोध लागलेला नसल्याने प्रशासनाने दोन्ही ठिकाणचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या (Nandura Gas Refilling Action) प्रकरणी 'जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५' अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई आणि गुन्हा नोंद करण्यासाठी दोन्ही प्रकरणे नांदुरा येथील निरीक्षण अधिकारी श्रीमती सुमन एस. कराडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.