नांदेडमधील शेतकरी आक्रमक; आता कोरड्या बैठका अन् पाहणी नको, थेट मदत द्या
अर्धापूर/ नांदेड (Nanded farmers Aggressive) : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाचा खंड पडला असून नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापसाचे पीक पार करपून गेले आहे. शेतात पिकांची केवळ झाडे उभी असून शेंगांमध्ये दाणेच भरलेले नाहीत. अशा भयानक कोरड्या दुष्काळस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे दौरे मात्र केवळ पाहणी आणि बैठकांमधील काजू-बदामाच्या मेजवान पुरतेच मर्यादित राहिल्याने जिल्ह्यातील शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत.
सरकारच्या ढिसाळ कारभारावर आणि बैठकांमधील सुकामेव्याच्या चोचल्यांवर अत्यंत जळजळीत शब्दांत संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी थेट आव्हान दिले आहे. तुमच्या अधिकाऱ्यांनी अख्या शेतात फिरून १ किलो सोयाबीन काढून दाखवावे आणि बदल्यात क्विंटलभर काजू, बदाम, पिस्ता घेऊन जावे, यासाठी लागल्यास आम्ही गावात वर्गणी (चंदा) गोळा करू असा घणाघाती टोला शेतकऱ्यांनी मारला आहे.
दुष्काळाच्या या गंभीर संकटात अधिकाऱ्यांच्या नुसत्या बैठका आणि कागदी पाहणी म्हणजे (Nanded farmers Aggressive) शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. आम्हाला आता कुठलीही पाहणी किंवा बैठकांचे नाटक नको तर पिकांच्या झालेल्या नुकसानीची थेट आणि रोख मदत खात्यावर जमा करा अशी एकमुखी मागणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.