जागा अन्य कारणासाठी देण्यास तीव्र विरोध
हिंगोली (Nanaji Deshmukh National Memorial) : भारतरत्न स्व. नानाजी देशमुख यांच्या हिंगोली येथील प्रस्तावित राष्ट्रीय स्मारकासाठी कृषी विभागाच्या गट क्रमांक 99 मधील 4 एकर संपूर्ण जागा कायमस्वरूपी स्मारकासाठीच राखीव ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नानाजी देशमुख यांचे नातू शशिकांत देशमुख आणि प्रवीण सोनी यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन सादर केले आहे. सदरील स्मारकाचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न नानाजी देशमुख हे हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय स्मारक व अत्याधुनिक संग्रहालय उभारणे ही जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेची बाब आहे. राष्ट्रसेवा, ग्रामीण विकास, कृषी उन्नती, स्वावलंबन, शिक्षण आणि ग्रामोदय या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे.
हिंगोली शहरातील कृषी विभागाच्या मालकीचा गट क्रमांक 99 हा राष्ट्रीय स्मारकासाठी अत्यंत योग्य असून, या जागेवर स्मारक उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर प्राथमिक आराखडा आणि नियोजन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रस्तावित स्मारकात भव्य संग्रहालय, संशोधन केंद्र, डिजिटल गॅलरी, ग्रामीण विकास अभ्यास केंद्र आणि प्रेरणास्थळ उभारण्याची संकल्पना आहे.
मात्र, याच गट क्रमांक 99 मधील 4 एकर जमीन इतर उपक्रमासाठी देण्याचा प्रस्ताव पुढे येत असल्याची माहिती समोर आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचे नियोजन सुरू असताना त्याच जागेचा काही भाग इतर कारणासाठी हस्तांतरित केल्यास भविष्यात स्मारकाच्या उभारणीवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
नानाजी देशमुख (Nanaji Deshmukh National Memorial) यांचे संपूर्ण कार्य हे कृषी, ग्रामीण विकास आणि ग्रामस्वावलंबनाशी निगडित असल्याने कृषी विभागाच्याच जागेवर त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे अधिक सुसंगत आणि प्रतीकात्मक ठरेल, असा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे. त्यामुळे गट क्रमांक 99 मधील कोणतीही जमीन गृहनिर्माण किंवा अन्य कारणासाठी हस्तांतरित न करता संपूर्ण 4 एकर जागा नानाजी देशमुख यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कायमस्वरूपी राखीव म्हणून घोषित करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या मागणीला जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था, युवक, विविध संघटना आणि नानाजींच्या विचारांशी संबंधित कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. जर सदर इतर प्रस्ताव तात्काळ रद्द करून जागा स्मारकासाठी राखीव न ठेवल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.