खानापूर चित्ता (Highway power supply) : हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील विद्युत पुरवठा मागील अनेक दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाल्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 या हेल्पलाइनवर वारंवार तक्रारी नोंदवूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, खानापूर चित्ता दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणीचे स्ट्रीट लाईट्स बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंधारात प्रवास करावा लागत आहे. तर सकाळी मॉर्निंग वाकला जाणाऱ्या वयोवृद्ध, पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या तरुण युवकाला अंधारातच सराव करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विशेषतः याच राष्ट्रीय महामार्गावरून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी रहदारी करणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. काही ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्याची माहितीही स्थानिकांकडून समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “1033 हेल्पलाइनवर अनेक वेळा फोन करून तक्रार नोंदवली, परंतु केवळ आश्वासने मिळाली. प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती किंवा काम सुरू झाल्याचे दिसून आले नाही.” त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खानापूर व चित्ता परिसरातील व्यापारी व रहिवाशांनीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “रात्री अंधारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
याबाबत संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, नागरिकांनी तातडीने दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.