‘आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार’; शासनाविरोधात मराठा समाजाचा संताप
शिरूर अनंतपाळ : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असताना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाण येथील सुनील बिरादार (४२) या तरुणाने मंगळवारी दि. ८ सप्टेंबर रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या घटनेनंतर तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा संताप उफाळून आला.
अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असतानाच सुनील बिरादार यांच्या आत्महत्येने आंदोलनाला आणखी तीव्र वळण मिळाले आहे. शासनाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची आणि मराठा समाजाच्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी संतप्त मराठा बांधवांनी केली.
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी लातूर-उदगीर जाणाऱ्या येरोळ मोड येथे सुनील बिरादार यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. संतप्त आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार, असा आक्रमक पवित्रा मराठा समाजबांधवांनी घेतला. त्यामुळे येरोळ मोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाचा जीव गेल्यानंतरही शासनाने आता तरी जागे व्हावे, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा प्रश्न केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस निर्णय घेऊन मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामुळे येरोळ मोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन व पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला.
सुनील बिरादार यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.