सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा फटका, खासदार-आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी
मानोरा (Manora National Highway) : मानोरा शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने शहरातील नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण हायवेवर काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन सर्व लाईट सुरू करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नॅशनल हायवेवरील स्ट्रीट लाईट गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून पूर्णपणे बंद होते. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर गणपती उत्सवाच्या पर्वावर जनतेने आक्रमक भूमिका घेत लाईट सुरू करण्याची मागणी लावून धरली. जनतेच्या रोषानंतर विभागाला जाग आली आणि घाईगडबडीत अर्धे लाईट सुरू करण्यात आले. परंतु, अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त लाईट बंदच आहेत.
विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि (Manora National Highway) वर्दळीच्या ठिकाणचे दिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी हायवेवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या भीतीचा सामना करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटनांची भीतीही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, रात्रीच्या वेळी हायवेवर अंधार असल्याने वाहनांच्या किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. समोरून येणारे वाहन न दिसल्याने अनेकदा समोरासमोर धडक होण्याच्या घटना घडत आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा (Manora National Highway) नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ यांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनीच याची देखभाल करणे अपेक्षित आहे. मात्र विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता खासदार आणि आमदार महोदयांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ यांच्याकडे पाठपुरावा करून शहरातील सर्व बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मानोरा शहरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
शहरातील हायवेवरील लाईट सुरू करण्यासंदर्भात नगर पंचायतच्यावतीने सबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आले आहे. मात्र तरीही दखल घेण्यात आलेली नाही.
- हेमेंद्र ठाकरे, नगराध्यक्ष, नगरपंचायत मनोरा