मानोरा (Manora Nagar Panchayat) : मानोरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधेसाठी विविध ठिकाणी बांधण्यात आलेली सार्वजनिक शौचालये बांधकाम पूर्ण झाल्यापासून अथवा सुरु करण्यात आल्यापासून अनेक ठिकाणी १० ते १२ महिन्यांपासून पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. यासंदर्भात चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध कार्यवाही करून तात्काळ शौचालये सुरू करावेत, असे निवेदन मुख्याधिकारी यांना माजी नगरसेवक अहमद बेग चांद बेग यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात अहमद बेग यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक शौचालये बंद असल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या निधीतून सार्वजनिक सुविधा निर्माण करून ती नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. तसेच सदर सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व इतर कामांसाठी नगरपंचायतीस प्राप्त झालेला निधी नेमका कोणत्या कामासाठी व किती प्रमाणात खर्च करण्यात आला आहे, याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झालेली आहे.
सदर निधीचा योग्य प्रकारे वापर न करता त्यामध्ये गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार झाला आहे का, याबाबत निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, (Manora Nagar Panchayat) नगरपंचायत हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची सद्यस्थितीचा अहवाल तयार करण्यात यावा, बंद असलेली सर्व सार्वजनिक शौचालये तात्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या वापरासाठी सुरु करण्यात यावीत, सदर शौचालयांच्या बांधकाम, देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेसाठी आजपर्यंत प्राप्त झालेल्या निधीची माहिती देण्यात यावी, प्राप्त निधीपैकी किती रक्कम कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आली, त्याचा खर्चाचा तपशील व संबंधित कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.
निधीच्या वापरात कोणताही गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्यास संबंधितांची चौकशी करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. (Manora Nagar Panchayat) सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल अर्जदारास देण्यात यावा. तरी सदर बाब ही नागरिकांच्या मूलभूत सार्वजनिक सुविधेशी संबंधित असल्याने याची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी आणि सार्वजनिक शौचालये तात्काळ सुरु करावीत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.