कुरूंदा (Tokai Sugar Factory) : वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील टोकाई साखर कारखान्याकडून ऊस पुरवठादार शेतकर्यांच्या थकीत एफआरपी रकमेवरील १५ टक्के व्याजाची रक्कम अद्याप अदा न केल्याप्रकरणी साखर आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन टाळण्यासाठी कारखान्याची साखर व मोलॅसेस जप्त करून त्याचा लिलाव करावा आणि त्या रकमेतून शेतकर्यांचे व्याज वर्ग करावे, अशा हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. शेतकरी सभासद बाजीराव देशमुख व जगदिश दळवी यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे निवासी उपजिल्हाधिकारी बोधवड यांनी उपविभागीय अधिकारी वसमत यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाच्या आदेशानुसार, टोकाई कारखान्याने एफआरपीच्या थकीत रकमेवर १५ टक्के व्याज शेतकर्यांना देणे बंधनकारक आहे.
दिलेल्या आदेशाचा अवमान होऊ नये यासाठी गरज पडल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २०२२-२३ या हंगामातील आर.आर.सी. रक्कम २८,१६,१७,७०० पैकी कारखान्याने १८,४३,३२० कपात करून उर्वरित २७,९७,८४,४८९ इतकी रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. मात्र १५ टक्के व्याजाची रक्कम अद्याप थकित आहे. साखर आयुक्त कार्यालयाचे संचालक यशवंत गिरी यांनी टोकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना अंतिम पत्र पाठवले आहे.
थकीत रकमेवरील १५ टक्के व्याजाची रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा करून त्याचा अहवाल सादर करावा, अन्यथा आरआरसी आदेश रद्द करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.