कळमनुरी (MKP Dharane Andolan) : चारही श्रमसंहिता रद्द कराव्यात, सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, वीज दुरुस्ती विधेयक मागे घेऊन वीज क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे, यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने १० ऑगस्ट रोजी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बी. बी. धूत यांच्याकडे सादर करण्यात आले.
योजना कामगार, पीस रेटेड कामगारांसह सर्व कामगारांना दरमहा किमान ४२ हजार रुपये वेतन द्यावे आणि ते महागाई भत्त्याशी जोडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मनरेगा योजना पूर्ववत करून वर्षाला २०० दिवस काम आणि दररोज ७०० रुपये मजुरीची हमी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. देशाच्या हिताला बाधक ठरणारे तसेच देशाला परकीय राष्ट्रे व कंपन्यांच्या अधीन करणारे व्यापार करार रद्द करावेत, शेतकरी, शेतमजूर व गरीब जनतेला संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि भूसंपादन कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेती व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच सहकारी क्षेत्रातील कृषीआधारित उद्योगांचे आधुनिकीकरण करावे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सार्वजनिक सेवांचे खासगीकरण, निर्गुंतवणूक व विक्री थांबवावी. नैसर्गिक संसाधनांची लूट, आउटसोर्सिंग आणि कंत्राटीकरणाला आळा घालावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
याशिवाय जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, मंजूर पदांवर तातडीने भरती करावी तसेच नवीन पदे निर्माण करून रोजगार व उपजीविकेची साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात चंपतराव नाईक, अंकुश बुधवंत, रमेश देवरे, उमेश चव्हाण, विश्वासराव कुठे, सुरेश काचगुंडे, शाहिद कादरी, यांच्यासह माकपचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते