झाडीबोली महर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांना साहित्यव्रती
कविता मोरवणकर, डॉ.शिवाजी शिंदे, क्षितीज देसाई, प्रभू राजगडकर,
रश्मी पदवाड, मोहन काळे बबन नाखले,अरूण मानकर पुरस्काराचे मानकरी
अमरावती (Amravati Literary Award) : मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे ट्रस्ट,अमरावती यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या २०२५च्या उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिक, झाडीबोलीमहर्षी, .डॉ.हरिश्चंद्र बोरकर साकोली जिल्हा भंडारा यांना ‘साहित्यव्रती’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. विविध साहित्य प्रकारासाठी राज्यातील साहित्यिकांना सन्मानीत करणारी विदर्भातील ही मोठी पुरस्कार योजना आहे.
या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार रश्मी पदवाड मदनकर, नागपूर यांच्या 'कायांतर' या कादंबरीला देण्यात आला आहे तर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार क्षितिज देसाई, ठाणे 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते' या कथासंग्रहाला मिळाला आहे. रत्नागिरीच्या कविता मोरवणकर यांच्या 'उद्याचा दहशतगर्द अंधार' या कवितासंग्रहाला व गडचिरोली येथील प्रभू राजगडकर यांच्या "येथे आमचाही श्वास कोंडतो" आहे यांना पुरस्कार जाहीर झाला. सोलापूरचे डॉ.शिवाजी शिंदे यांचा समीक्षाग्रंथ 'निवडक स्री आत्मकथने-सामाजिक सत्व आणि स्वत्व' हा समीक्षा ग्रंथ व उत्कृष्ट संपादनासाठी 'अक्षयआंदण' (शिवा राऊत यांची कविता) या ग्रंथाची निवड झाली आहे. या ग्रंथाचे संपादन बबन नाखले व श्री अरूण मानकर यांनी केले आहे. बालवाड्.मय प्रकारात नवी मुंबई चे मोहन काळे यांच्या 'चला पुन्हा शाळेत जाऊ या'' या बालकाव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तीन हजार रूपये रोख, शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. शिरजगाव येथील युवा कवी नितीन पर्हाड याला ‘उभरती प्रतिभा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
माजी राज्यमंत्री व आमदार प्रवीणभाऊ पोटे पाटील यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या ट्रस्टच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून मराठी साहित्यातील विविध लेखन प्रकारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्याचा मानस केला आहे.याच योजने अंतर्गत विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्य सेवेची दखल घेऊन त्यांना ‘साहित्यव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी यंदा भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, झाडीबोली महर्षी म्हणून विख्यात असलेले मा. डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांना त्यांच्या प्रदीर्घ व निरंतर साहित्यसेवेसाठी देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने एकमताने घेतला.
या (Amravati Literary Award) पुरस्कार योजनेसाठी प्राप्त झालेल्या ग्रंथांचे मान्यवर परिक्षकांनी परिक्षण केल्यानंतर पुरस्कार समितीच्या सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात येऊन पुरस्कारांचे मुख्य आयोजक माजी राज्यमंत्री व आमदार, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रवीणभाऊ पोटे, संस्थेचे सचिव श्री श्रेयसदादा पोटे, समितीच्या संयोजक प्राचार्य डॉ. शोभा रोकडे , प्राचार्य डॉ.अनुप्रिता देशमुख यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य प्रा.डॉ.कुमार बोबडे, प्रा़ डॉ.पंकज वानखडे, विशाल मोहोड, संदिप देशमुख उपस्थित होते.सदर पुरस्कारांचे वितरण पी.आर.पोटे पाटील ग्रूप ऑफ एज्यूकेशनल इन्स्टीट्यूट, मुख्य कार्यालय सभागृह,कठोरा रोड, अमरावती येथे एका शानदार सोहळ्यात करण्यात येईल.