लातूर (Latur Constitution March) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांच्या जाहीर सभेनंतर करण्यात आलेल्या जातीयवादी कृत्याविरोधात आणि या प्रवृत्तीविरोधात परखड आवाज उठवणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ लातूर शहरात काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने सोमवारी ‘संविधान मार्च’ काढून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या या मोर्चाचे रूपांतर राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात भव्य निषेध सभेत झाले.
या (Latur Constitution March) निषेध सभेला संबोधित करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत प्रहार केला. देशाच्या संसदेत आणि सार्वजनिक जीवनात तब्बल ५० ते ५५ वर्षे निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या एका दलित समुदायातील ज्येष्ठ व उत्तुंग नेतृत्वाची जाहीर सभा पार पडल्यानंतर, त्या स्टेजचे गोमूत्र शिंपडून तथाकथित शुद्धीकरण करणे ही अत्यंत विकृत आणि संविधानाची पायमल्ली करणारी कृती आहे, असा घणाघात साळुंके यांनी केला.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. उदय गवारे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्या प्रवृत्तींनी विरोध केला होता, तीच साडेतीनशे वर्षांपूर्वीची मनुवादी मानसिकता आज पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचा थेट आरोप केला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माधव बावगे यांनीही आपले विचार परखडपणे मांडले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन माने यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर जोरदार हल्ला चढवला. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी, महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी व चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात घडलेली ही घटना अत्यंत लांच्छनास्पद असल्याचे सांगत, अशा विकृत समाजकंटकांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेत्या सुनिताताई आरळीकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेचा समारोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी केला.
आंदोलनात महाविकास आघाडीतील शेकाप, मुस्लिम सत्यशोधक संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भटक्या-विमुक्त व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संविधान प्रेमी संघटनेचे सर्व पदाधिकारी व संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचलन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले.