लातूर काँग्रेस एल्गार

लातूर येथे निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार!

Latur Congress Elgar: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी, पक्षपाती आणि हुकूमशाही कारभाराविरोधात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने

लातूर येथे निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार!

Latur Congress Elgar

 

ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याला जोडे मारून निवडणूक आयोगाचा निषेध तीव्र निषेध

लातूर (Latur Congress Elgar) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी, पक्षपाती आणि हुकूमशाही कारभाराविरोधात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

 या (Latur Congress Elgar) आंदोलनादरम्यान संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याला उलटा टांगून त्यावर तीव्र रोष व्यक्त केला, तसेच ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला. आंदोलनाच्या मुख्य मंचावर 'व्होट चोरी विरोधात जनतेचा एल्गार - देशद्रोही ज्ञानेश कुमार हटावो, लोकशाही बचाओ' अशा आशयाचे मोठे फलक लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत "व्होट चोर - गद्दी छोड", अशा गगनभेदी घोषणा दिल्या, ज्यामुळे चौकातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

आंदोलनात खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपली भूमिका मांडत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.

जिल्हाध्यक्ष साळुंके यांच्याकडून आयोगाच्या कारभाराची पोलखोल
लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी आपल्या आक्रमक शैलीत आंदोलनाला संबोधित केले, यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात अतिशय पद्धतशीर आणि पूर्वनियोजित (प्री-प्लॅन) व्होट चोरी सुरू आहे.   आयोगातील इतर दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी) किमान १४ वेळा नोटिंग व ईमेलद्वारे ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी निर्णयांवर गंभीर आक्षेप नोंदवले होते. यावरून निवडणूक आयुक्तांची ही संपूर्ण मिलीभगत उघडी पडली आहे. रेल्वे प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या टोळ्यांप्रमाणेच मतदारांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत, देशातील लोकशाही व मतदानाचा अधिकार धोक्यात आणणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात महापौर जयश्री सोनकांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.