हिंगोली (Credit Society Fraud Case) : पैनगंगा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी मर्यादित कुरुंदा या पतसंस्थेतील ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2024 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने ठेवीदारांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
फिर्यादी नाथराव पांडुरंग जाधव रा. चौंडी बहीरोबा ता. वसमत जि. हिंगोली यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कुरुंदा येथे सन 2024 मध्ये गु.र.नं. 544/2024 कलम 420 भादंवि सह कलम 3, 4 एमपीआयडी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा, हिंगोली यांच्याकडे सुरु आहे. या तपासाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.शेकडे, आर्थिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी आज दि. 8 सप्टेंबर रोजी प्रेस नोट जारी केली आहे.
सदर पतसंस्थेत (Credit Society Fraud Case) ज्या ठेवीदारांची फसवणूक झाली असेल, अशा सर्व ठेवीदारांनी आपल्या ठेवीची संपूर्ण कागदपत्रे घेऊन आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.