कोरचीत कोंडवाड्यातील १० जनावरे ज्ञान फाउंडेशनच्या गोशाळेत रवाना
मालकांनी दंड न भरल्याने व जनावरांवर मालकी हक्क न दाखवल्याने प्रशासनाचा निर्णय
कोरची (Korchi Nagar Panchayat) : कोरची शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या संचाराला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. रहदारीच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोंडवाड्यातील एकूण १० जनावरांना मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी ज्ञान फाउंडेशन, गराडा, लाखनी, जि. भंडारा येथील गोशाळेत सुरक्षितरीत्या रवाना करण्यात आले.
कोरची शहरातील प्रमुख रस्ते तसेच रहदारीच्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा संचार वाढला होता. त्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांकडून नगरपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कोरचीच्या वतीने २५ ऑगस्ट २०२६ रोजी रहदारीच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. पकडण्यात आलेल्या जनावरांना काही दिवस कोंडवाड्यात ठेवण्यात आले.
कोंडवाड्यात ठेवण्यात आलेल्या जनावरांच्या मालकांनी संबंधित जनावरे परत घेण्यासाठी आवश्यक दंड भरावा, अशी प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र संबंधित जनावरांचे मालक पुढे आले नाहीत. कोणत्याही मालकाने या जनावरांवर आपला मालकी हक्कही दाखवला नाही.
नगरपंचायतीकडून याबाबत वृत्तपत्रात जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध करूनही जनावरांचा ताबा घेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने अखेर नगरपंचायतीने ही जनावरे गोशाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. कोंडवाड्यातील एकूण १० जनावरांना ८ सप्टेंबर रोजी ज्ञान फाउंडेशन, गराडा, लाखनी, जिल्हा भंडारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. जनावरांना सुरक्षितरीत्या वाहनातून गोशाळेत रवाना करण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोकाट जनावरांचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. जनावरे रस्त्यांवर फिरण्याबरोबरच शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत होत्या. रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठीही अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन भविष्यातही रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांविरोधात अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, जनावरांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्या मालकांची असताना जनावरे रस्त्यावर मोकाट सोडली जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नगरपंचायतीच्या या कारवाईनंतर जनावरांचे मालक यापासून काय बोध घेतात आणि भविष्यात मोकाट जनावरांची समस्या कमी होते का, याकडे आता कोरचीकरांचे लक्ष लागले आहे.
सध्या दहा जनावरांना गोशाळेत पाठवण्यात आलेले आहे भविष्यात सुद्धा नागरिकांना होणारा त्रास बघता अशाच प्रकारे नियमानुसार टप्प्याटप्प्याने मोकाट जनावरांवर कारवाई करून त्यांना सुरक्षितरीत्या गोशाळेत पाठवण्यात येईल.
- प्रितीश मगरे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, कोरची