कळमनुरी शेतकरी आंदोलन

संतप्त शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍याच्या खुर्चीला निवेदन ठेवून केले आंदोलन

Kalamnuri Farmers' Protest: पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस, हळद, तूर, ऊस यासह खरीपाची पिके संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी सोयाबीनची पिके जागेवरच करपून पिवळी पडत आहे.

संतप्त शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍याच्या खुर्चीला निवेदन ठेवून केले आंदोलन

Kalamnuri Farmers' Protest

 

कळमनुरी तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा

कळमनुरी (Kalamnuri Farmers' Protest) : तालुक्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस, हळद, तूर, ऊस यासह खरीपाची पिके संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी सोयाबीनची पिके जागेवरच करपून पिवळी पडत असून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कळमनुरी तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्यावा, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज तालुका कृषी कार्यालयात आंदोलन केले.

शेतकरी (Kalamnuri Farmers' Protest) निवेदन देण्यासाठी कृषी कार्यालयात गेले असता संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांच्या खुर्चीवरच निवेदन आणि जळालेली सोयाबीनची झाडे ठेवून निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे काही काळ कृषी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर अधिकारी उपस्थित झाल्यावर त्यांनी शेतकर्‍यांचे निवेदन स्वीकारले. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे तालुक्यातील अनेक भागात पिके वाळून चालली आहेत.

सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला असून आता जरी पाऊस झाला तरी हातातोंडाशी आलेले पीक वाचण्याची शक्यता कमी आहे. शेतकर्‍यांनी मशागत, मजुरी, बियाणे, खते, औषधे यासाठी मोठा खर्च केला आहे. अनेकांनी उसनवारी आणि कर्ज काढून शेतीत गुंतवणूक केली आहे. पिके वाया जाण्याच्या परिस्थितीमुळे कर्जफेड, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करावी, तातडीने पंचनामे करावेत आणि कळमनुरी तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा.

तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई आणि पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी हिंगोली आणि तालुका कृषी अधिकारी कळमनुरी यांना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनात भाऊराव पतंगे, विठ्ठल देशमुख, विनोद बांगर, साहेबराव पांग, प्रेम बलखंडे, ज्ञानेश्वर पतंगे, सादिक पठाण, अमर गाभणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.