औषधांसाठी बाहेरच्या मेडिकलचा आधार;
आंदोलनातून जमा झालेले १२१ रुपये आरोग्यमंत्र्यांना मनीऑर्डरने पाठविण्याचा निर्धार
कळमनुरी (Bhik Mago Andolan) : उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, याचा निषेध म्हणून एका रुग्णाच्या वडिलांनी ७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर चक्क (Bhik Mago Andolan) ‘भीक मागो’ आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
शहरातील अल्ताफ पठाण हे आपल्या आजारी मुलीला उपचारासाठी ६ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले होते. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर आवश्यक असलेली काही औषधे रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगत ती बाहेरील मेडिकलमधून आणण्यास सांगितले असल्याचे अल्ताफ पठाण यांनी सांगितले.शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतरही औषधे बाहेरून खरेदी करण्याची वेळ आल्याने पठाण यांनी नाराजी व्यक्त केली.
याच्या निषेधार्थ अल्ताफ पठाण यांनी ७ ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयाच्या दरवाजासमोर बसून दस्ती टाकून भीक मागो आंदोलन केले. या वेळी नागरिकांनीही आंदोलनाला प्रतिसाद देत त्यांच्या दस्तीमध्ये पैसे टाकले. आंदोलनादरम्यान एकूण १२१ रुपये जमा झाले. आंदोलनानंतर अल्ताफ पठाण यांनी जमा झालेले १२१ रुपये घेऊन घरी जाताना हे पैसे आरोग्यमंत्र्यांना मनीऑर्डरने पाठविणार असल्याचे सांगितले. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणार्या गरीब व सर्वसामान्य रुग्णांना औषधे उपलब्ध होत नसतील तर त्यांनी उपचारासाठी कुठे जावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याची चर्चा असून, औषधांचा पुरवठा व उपलब्धतेचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासनाकडून आरोग्य सुविधांसाठी निधी व औषधांचा पुरवठा होत असताना प्रत्यक्ष रुग्णांना औषधे उपलब्ध होत नसतील तर त्याची जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शासकीय रुग्णालयात येणार्या गरीब रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने औषधांचा नियमित साठा उपलब्ध ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.