८१४.४८ हेक्टर क्षेत्रातील ४१९३ मिळकतींच्या मोजणीचा प्रस्ताव
नगर परिषद व भूमी अभिलेख विभागात पत्रव्यवहार
हिंगोली (Hingoli Pending Property Card) : हिंगोली शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रॉपर्टी कार्डच्या प्रश्नासाठी निहाल भैय्या यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. शहरातील भू-नकाशा अंतर्गत विस्तारित क्षेत्रातील मिळकतींची मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याच्या दृष्टीने नगर परिषद, भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.
या संदर्भात हिंगोली नगर परिषदेने दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, हिंगोली यांना पत्र दिले आहे. भू-नकाशा अंतर्गत विस्तारित क्षेत्रातील मिळकतींची मोजणी करून पुढील कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव या पत्रात सादर करण्यात आला आहे.
उपलब्ध कागदपत्रांनुसार प्रस्तावित क्षेत्र ८१,४४,८०५.७ चौ.मी. म्हणजेच ८१४.४८ हेक्टर इतके असून त्यात अंदाजे ४,१९३ मिळकतींचा समावेश आहे. या यादीत शहरातील विविध भागांचा समावेश आहे.
दरम्यान, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाकडून दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी नगर परिषदेला पत्र देण्यात आले होते. त्यात प्रस्तावित क्षेत्रातील सर्व्हे नंबरची यादी, प्रस्तावित नकाशा आणि एकूण मिळकतींची संख्या उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले होते.

नगर परिषदेने यापूर्वीच संबंधित क्षेत्रांची माहिती, KML फाईल आणि नगर भूमापन झालेल्या क्षेत्राची माहिती भूमी अभिलेख विभागाकडे सादर केली आहे.
या (Hingoli Pending Property Card) पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने निहाल भैय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर परिषदेत प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद रामदास माळी आणि टाऊन प्लॅनर मोहेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
प्रॉपर्टी कार्ड (Hingoli Pending Property Card) उपलब्ध झाल्यास नागरिकांना मालमत्तेच्या हक्काचे अधिकृत दस्तऐवजीकरण मिळणार आहे. ८१४.४८ हेक्टर व ४१९३ मिळकतींचा विषय व्यापक असल्याने मोजणी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.