हिंगोली विवाह सोहळा

हुंडा पद्धतीला फाटा देऊन साक्षगंधांमध्येच उरकला विवाह सोहळा

Hingoli marriage ceremony: समाजात हुंडा प्रथेसारख्या अनिष्ट रूढीला छेद देत हिंगोली येथे एका कुटुंबाने साक्षगंध समारंभातच विवाह उरकून नवा आदर्श घालून दिला आहे.

हुंडा पद्धतीला फाटा देऊन साक्षगंधांमध्येच उरकला विवाह सोहळा

Hingoli marriage ceremony

हिंगोली (Hingoli marriage ceremony) : समाजात हुंडा प्रथेसारख्या अनिष्ट रूढीला छेद देत हिंगोली येथे एका कुटुंबाने साक्षगंध समारंभातच विवाह उरकून नवा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आनंद पुंजाराव मस्के यांचे धाकटे चिरंजीव ॲड. अक्षय आनंद मस्के व चि.सौ.का. ऋतुजा कैलासराव काईट, रा. पांढुर्णा यांचा साक्षगंध सोहळा मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी नवीन पोलीस वसाहतीतील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे ॲड. अक्षय मस्के LLM, MH-SET, M.A. समाजशास्त्र व लोकप्रशासन, http://B.Sc. भौतिकशास्त्र अशा उच्चशिक्षित आहेत. साखरपुड्याच्या दिवशीच बँड, मंडप, डेकोरेशन, भोजनावळी यावर होणारा दुहेरी खर्च व पाहुणे-नातेवाईकांचा वेळ वाचावा या हेतूने वराच्या संमतीने साक्षगंधातच विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या निर्णयाला कुटुंबातील औषध निर्माण अधिकारी गुलाब पुंजाराव मस्के, सामाजिक प्रकल्प अधिकारी पंडित पुंजाराव मस्के, प्रा. सौ. ज्योती पंडित मस्के, संगणक अभियंता अजय आनंद मस्के, महाराष्ट्र पोलीस दलातील राजू पोले तसेच संपूर्ण मस्के परिवाराने पाठिंबा दिला. विशेष म्हणजे मुलीकडील वऱ्हाडी मंडळींनीही या निर्णयाचे मनापासून स्वागत केल्याने संपूर्ण वातावरण मंगलमय आणि आनंदाने भारावून गेले.

सकाळी 9.30 वाजता SRPF कॅम्पजवळील नवीन पोलीस वसाहतीच्या मंगल कार्यालयात अत्यंत साधेपणाने व यथोचित सन्मानाने विवाह संपन्न झाला. या सोहळ्याला आमदार संतोषराव बांगर, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, नगर परिषद उपाध्यक्ष माबुदभाई बागवान, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, नगरसेवक राम कदम, गणेशराव बांगर, कपील खंडेलवाल, बाबू कदम, बाबा नाईक, जिल्हा परिषद सदस्य फकीरा मुंडे, किसराव मस्के, बालाजी बोके, सेवानिवृत्त PSI पंजाबराव हराळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे पंढरीनाथ ढाले, पंचायत समिती सदस्य तसेच पोलीस अधिकारी, प्राध्यापक, आरोग्य विभागातील अधिकारी, नगर परिषद कर्मचारी, पत्रकार व मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.

हुंडा न घेता, अवाजवी खर्चाला फाटा देत एकाच कार्यक्रमात दोन्ही विधी उरकल्याने मस्के व काईट कुटुंबीयांनी समाजापुढे प्रबोधनात्मक उदाहरण ठेवले आहे. लग्नाच्या नावाखाली होणारी आर्थिक उधळपट्टी आणि वेळेचा अपव्यय टाळता येतो, हा संदेश या विवाहातून दिला गेला. सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतल्यास कालबाह्य रूढींना मूठमाती देणे शक्य आहे, हेच या सोहळ्याने दाखवून दिले.

तरच लग्न संस्थेतील ही आर्थिक विषमता संपेल

कायद्याने हुंडाबंदी करून दशके लोटली, तरी 'देणं-घेणं' ही प्रथा नाव बदलून आजही जिवंत आहे. (Hingoli marriage ceremony) समस्या फक्त हुंडा मागणाऱ्या मुलाची नाही, तर ही प्रथा 'मान-पान' म्हणून स्वीकारणाऱ्या समाजाची आहे.  यावर खरा उपाय महिलांनी सहन करण्यापेक्षा मुलीच्या वडिलांनी नकार देण्यात आहे. जोवर 'मुलीचं लग्न करून द्यायचंय' या दबावाखाली वडील गप्प राहतील, तोवर ही खरेदी-विक्री थांबणार नाही.

हुंडा घेणाऱ्या मुलावर सामाजिक बहिष्कार ही पहिली पायरी आहे. कारण हुंडा म्हणजे परंपरा नाही, तर स्त्रीच्या स्वातंत्र्याची उघडपणे लावलेली बोली आहे. 
त्यामुळे फक्त घेणाऱ्यावरच नव्हे, तर देणाऱ्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तरच लग्नसंस्थेतील ही आर्थिक विषमता संपेल आणि काळानुसार बदल घडेल.
-बालाजी बोके सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हिंगोली