हिंगोली (Hingoli Ganesh Visarjan) : १४ सप्टेंबरला श्रींची स्थापना झाली असताना आता उद्या २५ सप्टेंबर रोजी १२ व्या दिवशी जिल्ह्यातील १६३३ ठिकाणी श्री विसर्जन करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पोलिस प्रशासनातर्फे सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात १४ सप्टेंबरला १७१० ठिकाणी श्री ची स्थापना झाली होती. ज्यामध्ये १९१ गावामध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती. शहरी भागात २७० ठिकाणी तर ग्रामीण भागात १४४० ठिकाणी श्रीची स्थापना करण्यात आली होती. गणेश उत्सव कालावधीत अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यासोबतच विविध उपक्रमही राबविण्यात आले. यासोबतच बर्याच ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. टप्याटप्याने श्रीचे विसर्जन सुरू आहे. ज्यामध्ये २० सप्टेंबरला नर्सी नामदेव पोलिस ठाणे हद्दीत एका ठिकाणी, २२ सप्टेंबरला हट्टा पोलिस ठाणे हद्दीत ३ ठिकाणी आणि गोरेगाव, नर्सी पोलिस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ ठिकाणी श्रीचे विसर्जन झाले. २३ सप्टेंबरला आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत तर २४ सप्टेंबरला कळमनुरी पोलिस ठाणे हद्दीत ४, हिंगोली शहर ठाणे हद्दीत १, सेनगाव पोलिस ठाणे हद्दीत २, नर्सी नामदेव पोलिस ठाणे हद्दीत ४ तर गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत १ अशा १२ ठिकाणी श्रीचे विसर्जन झाले आहे.
उद्या २५ सप्टेंबर रोजी १२ व्या दिवशी जिल्हाभरात सर्वाधिक श्रीचे विसर्जन होणार आहे. ज्यामध्ये पोलिस ठाणे निहाय हिंगोली ६२, औंढा नागनाथ २१५, कळमनुरी १२५, वसमत शहर १०४, सेनगाव १८५, आखाडा बाळापूर १५२, हट्टा १६८, कुरूंदा ९१, हिंगोली ग्रामीण १०९, गोरेगाव ११४, नर्सी नामदेव ८६, बासंबा १०५, वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत ११६ अशा एकुण १६३३ ठिकाणी श्रीचे विसर्जन होणार आहे. २६ सप्टेंबरला हिंगोली शहर ४१, सेनगाव ८, हिंगोली ग्रामीण १, गोरेगाव ३, नर्सी नामदेव ६ अशा ५९ ठिकाणी श्रीचे विसर्जन होणार आहे.
असा पोलिसांचा बंदोबस्त
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, ८४ अधिकारी ६२८ अमलदार ७७४ पुरूष व ११० महिला होमगार्ड, एटीएस पथक २, बीडीडीएस पथक २, १ एसआरपीएफ कंपनी, २ आरसी प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्री विसर्जन मार्गावर व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.