हिंगोली एसीबी कारवाई

हिंगोलीच्या एसीबी पथकाने नागपुरात आरटीओ एजंट पकडला; 50 हजार लाच घेताना रंगेहात कारवाई

Hingoli ACB Action: हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नागपूर येथे सापळा रचून आरटीओ एजंटला 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. वाहतूकदारांच्या वाहनांवर आरटीओ कडून कारवाई

हिंगोलीच्या एसीबी पथकाने नागपुरात आरटीओ एजंट पकडला; 50 हजार लाच घेताना रंगेहात कारवाई

Hingoli ACB Action

हिंगोली (Hingoli ACB Action) : हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नागपूर येथे सापळा रचून आरटीओ एजंटला 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. वाहतूकदारांच्या वाहनांवर आरटीओ कडून कारवाई होऊ नये म्हणून दरमहा 1 लाख 68 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या या एजंटला 13 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामीण आरटीओ नागपूर कार्यालया समोरील त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.

तक्रारदार हा 31 वर्षीय वाहतूक व्यवसायिक आहे. त्याच्याकडे स्वतःच्या 10 आणि मित्रांच्या 9 अशा एकूण 19 वाहने आहेत. या सर्व वाहनांवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी आरोपी सचिन पुरुषोत्तम कातुरे वय 43, रा. फ्लॅट क्रमांक 502, रतन हाइट्स अपार्टमेंट, मेडिकल स्क्वेअर, नागपूर याने काही वाहनांसाठी 6 हजार आणि काही वाहनांसाठी 10 हजार 500 रुपये प्रमाणे दरमहा एकूण 1 लाख 68 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 53 हजार रुपये तक्रारदार यांनी यापूर्वी फोन पे द्वारे दिले होते. उर्वरित रकमेसाठी आरोपीकडून सतत तगादा लावण्यात येत असल्याने तक्रारदार यांनी 11 ऑगस्ट रोजी हिंगोली लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12.32 वाजता पंच साक्षीदारांच्या समक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान आरोपीने यापूर्वी 42 हजार आणि 11 हजार असे एकूण 53 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. तसेच वाहनांचा मागील आणि चालू महिन्याचा हिशोब सांगून उर्वरित 1 लाख 23 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

पडताळणी नंतर 13 ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. आरोपीने त्याच्या कार्यालयात तक्रारदारांकडून 50 हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. लाचेची रक्कम हातात पडताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात येणार आहे.

ही (Hingoli ACB Action) संपूर्ण कारवाई पोलीस उप अधीक्षक विकास घनवट यांच्या नेतृत्वात पार पडली. सापळा पथकात पोलीस हवालदार राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, गजानन पवार, पोलीस शिपाई अमोल जाधव आणि चालक पोलीस हवालदार अकबर शेख यांचा समावेश होता. या कारवाईला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांचे मार्गदर्शन लाभले.