हट्ट्याचे नवीन ठाणेदार ज्ञानेश्वर बसवंते
पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आदेश
हट्टा (Hatta Thanedar Transfer) : येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरकर यांच्या बदलीबाबत मध्यंतरी चांगलीच चर्चा सुरू असताना २६ सप्टेंबरला त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यांच्या जागेवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर बसवंते यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांनी शनिवारी पदभारही स्विकारला.
वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याचा पदभार संदिप आनंदराव बोरकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपूर्वी सोपविण्यात आला होता. परंतु २६ सप्टेंबरला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढलेल्या आदेशात त्यांची बदली पोलिस नियंत्रण कक्ष हिंगोली येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आखाडा बाळापूर ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भुजंगराव बसवंते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी हट्टा ठाण्याचा पदभार स्विकारला आहे.
नुकताच गणेश उत्सव पार पडला. या कालावधीत अचानक सपोनि संदिप बोरकर यांची बदली झाल्याने त्यांच्या बदली मागे एक वेगळीच चर्चा ऐकावयास मिळत होती. अखेर श्री विसर्जन कालावधीमध्येच त्यांची बदली झाल्याने या बाबत चर्चेला अधिकच उधाण आले आहे.