वरुड चक्रपाण, बटवाडी, लिंबाळा हुंडी चर्चेत
सेनगाव (Gram Panchayat Sarpanch Reservation) : सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सुधारित आरक्षण सोडत बुधवारी ता.९ रोजी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या (ना.मा.प्र.) आरक्षण संख्येत वाढ झाल्याने यापूर्वी आरक्षण असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलले आहे.
यामध्ये वरुड चक्रपाण ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी जाहीर झाले. तसेच बटवाडी आणि लिंबाळा हुंडी ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण महिला (खुला महिला) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. या आरक्षण बदलामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांचे गणित बदलले आहे. आरक्षण सोडतीची माहिती समोर येताच ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींसाठी जाहीर झालेल्या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी २०, अनुसूचित जमातीसाठी ७, ना.मा.प्र.साठी २६, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५४ सरपंचपदे राखीव आहेत. यामध्ये महिलांसाठी अनुक्रमे १०, ४, १३ आणि २७ जागा राखीव आहेत. बैठकीस तहसील सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, निवडणूक नायब तहसीलदार वाकळे, तसेच विनोद चिलगर, नवनाथ दलसिंगार, सचिन पोपते यांच्यासह तहसील व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. आरक्षण सोडतीस तालुक्यातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.