लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी
हिंगोली (Goregaon Amaldar Chaturbhuj) : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील प्रकरणात जामिन मिळून देण्याच्या कारणातून व विरोधी गटावर कारवाई करण्याकरीता ३ हजाराची लाच घेताना ११ सप्टेंबरला सायंकाळी गोरेगाव पोलिस ठाण्यातील बीट अमलदारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने चतुर्भुज केले.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, कडोळी येथे भावकीच्या दोन गटात वादाची घटना घडली होती. ज्यामध्ये तक्रारदारावर अदखल पात्र गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास जमादार राहूल वसंत मैदकर याच्याकडे होता. या तपासात जामिन मिळून देण्यासाठी तसेच विरोध गटावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी बीट अमलदार राहूल मैदकर यांनी ४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीत ३ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. यावरून तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार दिली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी पथकानी केली.
११ सप्टेंबर रोजी गोरेगाव पासून काही अंतरावरील गोरेगाव ते खांबाळा चौफुलीवर सायंकाळी ४.३० च्या सुमारास सापळा रचण्यात आला. ज्यामध्ये तक्रारदाराकडून ३ हजाराची लाख घेताना जमादार राहूल वसंत मैदकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरु होती. हि कामगिरी लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. अश्विनी जगताप, पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, राजाराम फुपाटे, गजानन पवार, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ, चालक शेख अकबर यांच्या पथकाने केली आहे.