ग्रामपंचायत वापटा आर्थिक गैरव्यवहार

ग्रामपंचायत वापटा (हट्टी) येथे घरकुल आणि विहीर मस्टरमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

Vapta Gram Panchayat: मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत वापटा (हट्टी) येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुल आणि विहीर योजनेच्या मस्टरमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर

ग्रामपंचायत वापटा (हट्टी) येथे घरकुल आणि विहीर मस्टरमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

Vapta Gram Panchayat

 

रोजगार सेवकावर कारवाईची मागणी

मानोरा (Vapta Gram Panchayat) : मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत वापटा (हट्टी) येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुल आणि विहीर योजनेच्या मस्टरमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समस्त ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित रोजगार सेवकावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून तात्काळ पदावरून निलंबित करण्याची मागणी करणारे निवेदन गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, ज्या लाभार्थ्यांचे घरकुल आणि विहीर अर्ज कायदेशीररीत्या मंजूर झाले होते, त्यांच्या मस्टरमध्ये फेरफार करण्यात आला आहे. मूळ लाभार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा सूचना न देता, त्यांचा निधी परस्पर इतरत्र वळवून वितरित करण्यात आला आहे. रोजगार सेवकाने शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन करून, मस्टर रोल भरताना आणि निधी बँक खात्यात वर्ग करताना मोठी गोपनीयता बाळगली असून यामध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता आहे.

या मनमानी आणि बेकायदेशीर कारभारामुळे गावातील मूळ, गरजू आणि पात्र लाभार्थी हक्काच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
हा शासकीय निधीचा अपहार असून थेट गरिबांच्या हक्कावर गदा आणणारा प्रकार आहे. रोजगार सेवकाने संगनमताने केलेल्या या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.  ग्रामपंचायत वापटा (हट्टी) येथील घरकुल आणि विहिरीच्या मंजूर मस्टरची व बँक खात्यांवरील व्यवहाराची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी रोजगार सेवकावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ पदावरून निलंबित करण्यात यावे.  मूळ आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी तात्काळ मिळवून देण्यात यावा.

या (Vapta Gram Panchayat) प्रकरणाची त्वरित दखल घेऊन चौकशी समिती नेमण्यात यावी. अन्यथा न्याय न मिळाल्यास समस्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर राजेश  राठोड, प्रमोद चव्हाण, श्रीकृष्ण राठोड, अमोल  चव्हाण, कैलास  चव्हाण, युवराज गिरी, भिमराव राठोड, युवराज चव्हाण, गणेश गिरी, राजेश चव्हाण, गंगाराम  राठोड, दिलीप जकीर चव्हाण, अनिल चव्हाण यांच्यासह समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टैग्स: Vapta Gram Panchayat