आगमन होताच श्री करुणासिद्ध सार्वजनिक मंडळाकडून फुलांची उधळण करून स्वागत
पानकनेरगाव (Kawad Yatra) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथून श्री माणकेश्वर सार्वजनिक कावड यात्रेचे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता औंढा नागनाथकडे प्रस्थान झाले. शेकडो भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले होते.
कावडधारी भाविकांनी औंढा नागनाथ येथे पोहोचून श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर पवित्र तीर्थजल घेऊन कावड यात्रेने पानकनेरगावकडे परतीचा प्रवास सुरू केला.
सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कावड यात्रेचे पानकनेरगाव येथे उत्साहात आगमन झाले. यात्रेच्या आगमनावेळी ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावडधारी भाविकांचे जल्लोषात स्वागत केले.
औंढा नागनाथहून पवित्र जल आणून श्री माणकेश्वर बाबांना जलाभिषेक
विशेष म्हणजे, श्री करुणासिद्ध सार्वजनिक मंडळाच्या वतीने श्री माणकेश्वर सार्वजनिक कावड यात्रेचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने कावडधारी भाविकांवर फुलांची उधळण करून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या अनोख्या स्वागतामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कावड यात्रेची मिरवणूकही विविध आकर्षणांनी सजली होती. सजवलेले बैल, घोडी तसेच साधुसंत आणि राक्षसांचे वेशभूषात परिधान करून सहभागी झालेल्या व्यक्तींनी यात्रेची रंगत वाढवली.

सजवलेले बैल, घोडी, व देवदैवतांचे विविध वेशभूषा व आकर्षक देखाव्यांनी यात्रेची रंगत वाढवली
या सोबतच सुमारे दहा फुटाचा भव्य गोरिलाचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षक ठरला मुख्य रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या व तसेच फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या तालावर सुरू असलेला जल्लोष आणि फुग्यांच्या आकर्षक सजावटीमुळे मिरवणुकीला विशेष देखणेपणा प्राप्त झाला. यात्रेतील आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा वाघाचा जबडा फाडतानाचा अश्वारूढ पुतळा. या देखाव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विविध सजावट, देखावे आणि धार्मिक उत्साहामुळे संपूर्ण कावड यात्रा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
हर हर महादेव 'बम बम भोले’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कावडधारी भाविकांनी पानकनेरगावचे ग्रामदैवत श्री माणकेश्वर बाबांचे दर्शन घेऊन औंढा नागनाथहून आणलेल्या पवित्र तीर्थजलाने जलाभिषेक केला. जलाभिषेकानंतर कावड यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. यावेळी गावातील महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कावड यात्रेमुळे पानकनेरगाव परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
आयोजक : श्री माणकेश्वर सार्वजनिक कावड यात्रा मंडळ, पानकनेरगाव