शेतकरी नेते राठोड पोहोचले थेट मुख्यमंत्री मंत्रालय सचिवालयात
मानोरा (Drought affected Manora Taluka) : काल दि ७ सप्टेंबरच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दुष्काळ यादीत मानोरा तालुक्याचा समावेश नसल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळातून वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यासह परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा पोळा तहसील कार्यालयावर भरविण्याचा इशारा शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी दिला असुन थेट मुख्यमंत्री यांच्या सचिवालयात यासंदर्भात दि. ८ सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.
मानोरा तालुक्याला दुष्काळातून वगळून शासनाने केलेल्या दुजाभाव हा कष्टकऱ्यांचा अवमान आहे. आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणते पाप केले कि आम्हाला दुष्काळातून वगळले? हे प्रश्न विचारण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोळ्याच्या दिवशी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर हजर राहण्याच्या आव्हान परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून स्थानिक जिल्हाधिकारी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड हे निवेदन देऊन दुष्काळी तालुक्यात मानोरा तालुक्याचा समावेश करण्याची मागणी लावून धरली आहे. सोमवारला जाहीर झालेल्या (Drought affected Manora Taluka) दुष्काळ यादीत मानोरा तालुक्याचा समावेश मनोहर राठोड यांनी थेट मुंबई मंत्रालय गाठून मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन देऊन जर मानोरा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश न केल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांचा पोळा तहसील कार्यालयावर भरविण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
मानोरा तालुक्यात मागील ४३ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला पावसाअभावी मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी सोयाबीनचे पीक करपून वाळून गेले आहे. अनेक शेतकरी उभा सोयाबीन पिक वाळल्याने पिकामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडून शेत रिकामे करीत आहेत. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांसमोर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांना देऊन दुष्काळी सवलत लागू करावी अशी प्रमुख मागणी या शेतकरी पोळा आंदोलनातून करण्यात येणार आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पोळा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोहर राठोड यांनी केले आहे.