डोंगरशेवली शाळा शताब्दी महोत्सव

‘गुलामगिरीला लाथाडणारी, पिढ्या घडविणारी ही ज्ञानाची शाळा’: विद्याधर महाले

Dongarshevali School Centenary Celebration: स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या डोंगरशेवली येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा...

‘गुलामगिरीला लाथाडणारी, पिढ्या घडविणारी ही ज्ञानाची शाळा’: विद्याधर महाले

Dongarshevali School Centenary Celebration

 

शंभर वर्षांची ज्ञानपरंपरा जपणाऱ्या डोंगरशेवली शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

चिखली (Dongarshevali School Centenary Celebration) : स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या डोंगरशेवली येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.२६ जुलै १९२६ रोजी स्थापन झालेल्या या शाळेने शंभर वर्षांच्या वाटचालीत अनेक पिढ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे.

यावेळी शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन तसेच माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शंभर वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शाळेशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त केले.

यावेळी बोलताना विद्याधर महाले यांनी शाळेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेली ही शाळा म्हणजे केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर अनेक पिढ्यांना घडविणारे संस्कारकेंद्र आहे. गुलामगिरीच्या काळातही शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व्रत देणाऱ्या व्रतस्थ लोकांच्या प्रयत्नातून या शाळेची उभारणी झाली.

‘पिढ्या घडविणारी जिल्हा परिषद शाळा’ म्हणून डोंगरशेवलीच्या शाळेचा गौरव करताना त्यांनी शंभर वर्षांच्या या ज्ञानपरंपरेला वटवृक्षाची उपमा दिली. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी देत त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य या शाळेने केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्याधर महाले यांचे भाषण संपल्यानंतर माजी आमदार धृपदरावजी सावळे यांनी शाळेच्या पुढील विकासासाठी काहीतरी जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर श्री.विद्याधरजी महाले यांनी अत्यंत विनम्रपणे उत्तर देताना, “हा हक्क तुमच्यासारख्या राजकीय संघटनेतील मोठ्या लोकांचा आहे. त्या बाबतीत काही आदेश असेल तर आम्हाला सांगावे,” अशी विनम्र भूमिका मांडली.

या प्रसंगातून (Dongarshevali School Centenary Celebration) शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आणि शंभर वर्षांची ही ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अधिक सक्षमपणे नेण्याची भावना व्यक्त झाली.शताब्दी महोत्सवामुळे डोंगरशेवलीच्या या ऐतिहासिक शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला असून, २६ जुलै १९२६ रोजी पेटवलेली शिक्षणाची ज्योत शंभर वर्षांनंतरही तेवत असल्याचे भावनिक चित्र या सोहळ्यात पाहायला मिळाले.

या शताब्दी महोत्सवाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धृपदरावजी सावळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव श्री. विद्याधरजी महाले, अंकुशराव पडघान पाटील, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, सरपंच वैशाली शरद जवंजाळ, समाधान कणखर यांच्यासह शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.