रेणापुर युवक मृत्यू

परभणीत परमिट घेऊनही वीजप्रवाह सुरु; रेणापुरात युवकाचा बळी

Renapur Youth Death: परमिट घेऊन वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करून कृषी वाहिनीवरील विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीचे काम करण्याऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

परभणीत परमिट घेऊनही वीजप्रवाह सुरु; रेणापुरात युवकाचा बळी

Renapur Youth Death

 

कृषी वाहिनीच्या रोहित्रावर दुरुस्ती करताना मृत्यू 

मृतदेह महावितरण कार्यालयात आणत ग्रामस्थांचा ठिय्या

पाथरी (Renapur Youth Death) : परमिट घेऊन वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करून कृषी वाहिनीवरील विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या रेणापुर येथील ३६ वर्षीय तरुणाचा अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.४० वाजता रेणापुर शिवारात घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट पाथरी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाच्या परिसरात आणत ठिय्या दिला आहे. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि घटनेस जबाबदार असलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेणापुर शिवारातील कृषी वाहिनीच्या विद्युत रोहित्रावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी ज्ञानेश्वर गोरे हे सकाळी गेले होते. दुरुस्तीच्या कामापूर्वी स्थानिक ३३ केव्ही उपकेंद्राकडून आवश्यक परमिट घेण्यात आल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास गोरे हे रोहित्रावर दुरुस्तीचे काम करीत असतानाच अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 घटनेनंतर ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर गोरे यांचा मृतदेह पाथरी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाच्या परिसरात आणला. (Renapur Youth Death) मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच घटनेस कारणीभूत ठरलेल्या लाईनमनसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह कार्यालय परिसरातून हलविणार नाही तसेच गरज पडल्यास याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून महावितरण कार्यालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

लाईनमन कामे करतात तरी कोणती?
तालुक्यात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पाथरी महावितरणच्या कारभाराबाबत गंभीर आरोप होत आहेत. महावितरणकडील नियुक्त लाईनमन प्रत्यक्ष विद्युत वाहिनी, पोल किंवा रोहित्रावरील दुरुस्तीची कामे स्वत: न करता स्थानिक पातळीवरील कामात कुशल व्यक्तींमार्फत करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंत्राटी पद्धतीच्या कामकाजात सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

परमिट असतानाही वीजप्रवाह कसा सुरू झाला?
दुरुस्तीच्या कामासाठी परमिट घेण्यात आल्याचा दावा रेनापुर ग्रामस्थानी केला आहे. असे असताना संबंधित विद्युत वाहिनीवर पुन्हा वीजप्रवाह कसा सुरू झाला ? हा या घटनेतील सर्वांत गंभीर प्रश्न ठरला आहे. वीजपुरवठा बंद करण्यापासून ते दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंतच्या सुरक्षा प्रक्रियेत नेमकी कोणती त्रुटी राहिली ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.