संघटना मजबूत करण्याचा निर्धार; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
परभणी (Parbhani Nationalist Congress Party) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार १६ जुलै रोजी परभणीतील खानापूर फाट्याजवळील राष्ट्रवादी भवन येथे परभणी महानगर व ग्रामीण पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून परभणी दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, येणार्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत प्रत्येक गावापर्यंत पक्षाचे संघटन बळकट केले जाईल. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आक्रमकपणे लढणारी संघटना उभी करण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परभणी जिल्हा हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा असून, पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा येथे पक्षाचे मजबूत जाळे उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आगामी काळातील राजकीय आव्हाने लक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकार्याने सक्रियपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेनंतर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटना विस्तार, बूथस्तरावरील बांधणी, नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग, आगामी निवडणुकांची तयारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आंदोलन उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. अॅड. विजय गव्हाणे, माजी खा. फौजिया खान, प्रदेश प्रवक्ते भीमराव हत्तीअंबीरे, पंकज बोराडे, माजी आ. संजय वाकचौरे, सोनाली देशमुख, संतोष बोबडे, यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशिद, गंगाधर यादव, सुशिल कांबळे, प्रभाकर लंगोटे, दिलीप घुगे, शिवा नेटके, देवानंद हत्तीअंबीरे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'विलीनीकरण किंवा एनडीएसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'कुठल्याही प्रकारच्या चर्चा या केवळ सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहेत. ही सूत्रे कोण आहेत आणि त्यामागचा कर्ता-कर्विता कोण आहे, याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल.' 'अजित पवार पक्षात असताना पक्ष एकीकरणाच्या संदर्भात काही निर्णय झाला होता. मात्र भविष्यात इतर पक्षांमध्ये काय घडामोडी होतील किंवा ते कोणती भूमिका घेतील, याबाबत आमच्या पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही. इतर पक्षांतील घडामोडींशी आमचा संबंध जोडला जात आहे, पण त्यात कोणतेही तथ्य नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे विलीनीकरण किंवा एनडीएसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.'
-शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष