चिखली (Chikhli Revenue Lok Adalat) : वर्षानुवर्षे महसूल न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामंजस्य व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे विशेष अभियान राबविण्यात येणार असून, चिखली तालुक्यात मंडळ व तहसील स्तरावर महसूल लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्र. मराअ-२०२५/प्र.क्र.२७/समन्वय-१, दि. १३ ऑगस्ट २०२६ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशान्वये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल न्यायालयातील प्रलंबित अर्धन्यायिक दावे व अपीले आपापसातील सामंजस्याने निकाली काढण्याचा या (Chikhli Revenue Lok Adalat) अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
चिखली तालुक्यातील लोक अदालतींचे वेळापत्रक
चिखली तालुक्यातील मंडळ स्तरावरील महसूल लोक अदालत २४ सप्टेंबर २०२६, ३ डिसेंबर २०२६ आणि ४ मार्च २०२७ रोजी सकाळी १० वाजता संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच तहसील स्तरावरील लोक अदालत १ ऑक्टोबर २०२६, १० डिसेंबर २०२६ आणि ११ मार्च २०२७ रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार/नायब तहसीलदार कार्यालयात होणार आहे.
या (Chikhli Revenue Lok Adalat) लोक अदालतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अन्वये फेरफार वाद व हक्क नोंद तक्रारी, कलम १४३ अंतर्गत रस्त्याचे वाद, शेतातील पांदण रस्ते, वहिवाटीचे व बांधावरून जाणाऱ्या रस्त्यांचे वाद, पाणी वहिवाटीचे व शिवरस्त्यांचे तंटे, तसेच मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली विविध महसुली अपीले व पुनरीक्षण प्रकरणांचा समावेश राहणार आहे.
तडजोड अर्ज ‘प्रपत्र-अ’मध्ये सादर करावा
ज्या पक्षकारांची महसुली प्रकरणे मंडळ अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत, त्यांनी शासनाने विहित केलेल्या ‘प्रपत्र-अ’ मध्ये तडजोड अर्ज सादर करावा. या अर्जावर दोन्ही पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना तहसील कार्यालय चिखलीच्या न्यायालयीन शाखेत तसेच तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महसूल लोक अदालतीमुळे (Chikhli Revenue Lok Adalat) प्रलंबित प्रकरणांवरील वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होणार असून, दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य निर्माण करून वादाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी, खातेदार, पक्षकार तसेच वकील बंधू-भगिनींनी आपल्या प्रकरणाच्या संबंधित तारखेची नोंद घेऊन लोक अदालतीपूर्वी संबंधित कार्यालयात तडजोड अर्ज व आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करावी, असे आवाहन विजय सवडे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चिखली महसूल लोक अदालत
चिखली तालुक्यात महसूल लोक अदालतीचे आयोजन; प्रलंबित दावे सामंजस्याने निकाली काढण्याची संधी
Chikhli Revenue Lok Adalat: वर्षानुवर्षे महसूल न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामंजस्य व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देश
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Chikhli Revenue Lok Adalat
टैग्स:
Chikhli Revenue Lok Adalat