चिखली महावितरण

आसमानी संकटात सुलतानी संकटाची भर; महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक

Chikhli Mahavitaran: पावसाच्या लहरीपणामुळे पिके संकटात सापडलेली असताना शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना व मंगरूळ फिडरवरील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर

आसमानी संकटात सुलतानी संकटाची भर; महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक

Chikhli Mahavitaran

 

शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना, मंगरूळ फिडरवर विजेचा लपंडाव; पॉवर हाऊसवर ठिय्या देत शेतकऱ्यांचा संताप

चिखली (Chikhli Mahavitaran) : पावसाच्या लहरीपणामुळे पिके संकटात सापडलेली असताना शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना व मंगरूळ फिडरवरील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. महावितरणच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी 9 सप्टेंबर 2026 रोजी पॉवर हाऊसवर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

पावसाने उघाड दिल्याने खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरी, बोअरवेल व अन्य जलस्रोतांमधून पाणी देण्याची धडपड सुरू आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीज कधी येते आणि कधी जाते, याचा नेम राहिलेला नसल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जाऊन मोटारी सुरू करण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे.

तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय नाही
वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याबाबत संबंधित लाईनमन, कनिष्ठ अभियंता तसेच उपविभागीय अभियंत्यांकडे शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, तात्पुरती दुरुस्ती करण्यापलीकडे कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर कोमेजत असताना वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. कार्यालयीन तक्रारींनंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर शेतकऱ्यांनी पॉवर हाऊसवर धाव घेत ठिय्या आंदोलन केले.

“वीज मागतोय, उपकार नाही!”
“आम्ही वीज मागतोय, उपकार नाही. पिके वाचविण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा तरी सुरळीत द्या,” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. संबंधित फिडरची तातडीने पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरूपी दूर करावेत, वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे आणि शेतीपंपांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विजय परिहार, उद्धव चव्हाण, प्रकाश गवते, शिवा चव्हाण, भगवान परिहार, प्रमेश्वर सुरुशे, सागर परिहार, विष्णु परिहार, लक्ष्मण परिहार, अरुण परिहार, विकास चव्हाण, सुरेश पाटील, लक्ष्मण गावडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

पिकांना पाणी मिळाले नाही तर त्याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसतो. त्यामुळे महावितरणने कागदी आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष उपाययोजना करून संबंधित फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टैग्स: Chikhli Mahavitaran