१९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन
चिखली (Chikhli Assembly Constituency) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत २३-चिखली विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या (Chikhli Assembly Constituency) विशेष पुनरिक्षण मोहिमेत १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार, तसेच पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. याशिवाय मतदार यादीतील अस्तित्वातील नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच यादीतील नाव वगळण्यासाठीही नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
मतदारांच्या सोयीसाठी १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ या दिवशी २३-चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून मतदार यादीसंदर्भातील आपले अर्ज व दावे दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी नमुना-६, मतदार यादीतील विद्यमान नोंदीमध्ये सुधारणा करण्यासाठी नमुना-८, तर मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना-७ मध्ये अर्ज करता येणार आहे.
नागरिकांनी आवश्यक त्या पुराव्यांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे मतदार नोंदणी विभागाने स्पष्ट केले आहे. मतदार यादी अचूक व अद्ययावत राहण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने या विशेष मोहिमेत सहभागी होऊन आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती अथवा नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन राजेंद्र पोळ, मतदार नोंदणी अधिकारी, २३-चिखली विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.