संभाजीनगर वार्डातील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण;
प्रशासनाच्या कारभारावर अनिल वाकोडे यांची तीव्र नाराजी
चिखली (Chikhali Dog Attack) : चिखली शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाजीनगर वार्ड क्रमांक १० मध्ये अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करून त्याला खाली पाडत दोन ठिकाणी चावा घेतल्याची धक्कादायक घटना दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
संभाजीनगर वार्ड क्रमांक १० मध्ये बनकर वकील यांच्या घराजवळ लहान मुले घरासमोर खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने आयांश प्रमोद सुरडकर (वय ५ वर्षे) या चिमुरड्यावर हल्ला केला. (Chikhali Dog Attack) कुत्र्याने आयांशला खाली पाडून त्याच्या शरीरावर दोन ठिकाणी चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सोबत खेळत असलेली मुले घाबरली. त्यांनी कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला; मात्र कुत्रा ऐकत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली.
दरम्यान, परिसरातील विमलबाई येवतकर, तुळसाबाई अवसरमोल, गोपाल येवतकर, समाधान अवसरमोल, कुसाबाई हिवाळे तसेच आयांशची आजी विमल सुरडकर यांच्यासह शेजारील नागरिकांनी तातडीने धाव घेत कुत्र्याला हाकलून लावले. नागरिक वेळीच धावून आल्याने मोठा अनर्थ टळला आणि आयांशचा जीव बालंबाल वाचला. घटनेनंतर जखमी आयांशला उपचारासाठी प्रथम लोखंडे डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांनी सामान्य रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर आयांशला सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करून रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. मात्र जखम जास्त असल्याने जखमेच्या ठिकाणी आवश्यक असलेले अतिरिक्त इंजेक्शन व पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार कुटुंबीय आयांशला घेऊन बुलढाणा जिल्हा रुग्णालयात गेले.
परिसरात यापूर्वीही कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना
आयांशच्या घराजवळ (Chikhali Dog Attack) मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची ही पहिली घटना नसून यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दहा-बारा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने एका बकरीवर हल्ला करून तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अनेक नागरिकांनी एकत्र येऊन कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला; मात्र कुत्र्यांचा आक्रमकपणा कमी झाला नव्हता.
याच परिसरात एका वृद्ध व्यक्तीवरही या (Chikhali Dog Attack) मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले. बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पायाला कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीसीटीव्हीत घटना कैद
पाच वर्षांच्या आयांशवर झालेल्या (Chikhali Dog Attack) कुत्र्याच्या हल्ल्याची घटना परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांवर होणारे हल्ले किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होत आहे.
प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा: अनिल वाकोडे
या संपूर्ण घटनेची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल वाकोडे यांनी दिली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, लहान मुले आणि वृद्धांवर हल्ले होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे केवळ दुर्लक्ष न करता लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी अनिल वाकोडे यांनी केली आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चिखली शहरातील विविध भागांमध्ये (Chikhali Dog Attack) मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसून येत असून, विशेषतः सकाळ-संध्याकाळ लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या आयांशवर झालेल्या हल्ल्यानंतर तरी नगरपालिका प्रशासन जागे होऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.