स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांची जिंतूर तालुक्यात संयुक्त कारवाई
जिंतूर (Parbhani Cannabis cultivation) : तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ८ लाख २२ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला कान्हा शिवारामध्ये हळदीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. संतराम त्र्यंबक दुबळकर यांच्या ताब्यातील शेतात हळदीच्या पिकात लपवून ठेवलेली गांजाची नऊ झाडे मिळून आली. पोलिसांनी सदर कारवाईत ८ लाख २२ हजार ७५० रुपये किंमतीचा १६ किलो ४५५ ग्राम गांजा जप्त केला आहे. सपोउपनि. नितीन वडकर यांच्या फिर्यादीवरुन बामणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून तपास पोउपनि. प्रबोधन जोंधळे करत आहेत. ही कारवाईत स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे, पोउपनि चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार सिध्देश्वर चाटे, राम पौळ, नामदेव डुबे, दिपक जाधव, अनिल राठोड, विलास बहुरे, बामणी पोलीस स्टेशनचे सपोनि. मनोज सुरवाडे, कुर्हे, ठाकूर यांच्या पथकाने केली.