३६ वर्षांपासून बैलसंख्येची नोंद; डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी सुरू केलेली परंपरा बंधू रविंद्र भुसारी यांनी ठेवली कायम
समाधान गाडेकर
चिखली (Bullock Population Decline) : आधुनिक शेतीमध्ये वाढलेले यांत्रिकीकरण, बैलांच्या संगोपनाचा वाढता खर्च आणि बदलती शेतीपद्धती यामुळे ग्रामीण भागातील सर्जा-राजाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी गावातील बैलसंख्येची आकडेवारीही याच बदलत्या वास्तवाची साक्ष देत आहे. तब्बल ३६ वर्षांपासून गावातील बैलांची संख्या नोंदविण्याची परंपरा सुरू असून, सन २०२६-२७ मध्ये गावात केवळ ९० बैल शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
एकेकाळी शेतीच्या बहुतांश कामांसाठी बैलजोडीचा (Bullock Population Decline) वापर करणाऱ्या भोरसा-भोरसी गावात आता ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि अन्य कृषी यंत्रांनी बैलांची जागा घेतली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच मालवाहतुकीपर्यंतची अनेक कामे पूर्वी बैलांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, यांत्रिकीकरणामुळे बैलांवरील शेतीचे अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
१९९९ मध्ये ३२८, आता केवळ ९० बैल
गावातील बैलसंख्येची गेल्या ३६ वर्षांपासून नोंद घेतली जात आहे. ही नोंदणी करण्याची परंपरा डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी सुरू केली होती. मात्र, त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून त्यांचे बंधू रविंद्र कृष्णराव भुसारी यांनी यावर्षी बैलपोळ्याच्या निमित्ताने गावातील बैलांची मोजणी करून ही नोंद पुढे सुरू ठेवली. या नोंदीतून बैलसंख्येतील मोठी घट स्पष्टपणे दिसून येते. सन १९९९ मध्ये भोरसा-भोरसी गावात ३२८ बैल होते. सन २००४ मध्ये ही संख्या वाढून ३३२ वर पोहोचली होती. हा नोंदविलेला सर्वाधिक आकडा ठरला. त्यानंतर मात्र बैलसंख्या सातत्याने कमी होत गेली.
सन २०२३ मध्ये गावात ९६ बैलांची नोंद झाली होती. सन २०२४ मध्ये ही संख्या ९२, तर सन २०२५ मध्ये ८९ बैल इतकी झाली. यावर्षी सन २०२६-२७ मध्ये एका बैलाची वाढ होऊन ही संख्या ९० झाली आहे. म्हणजेच १९९९ मधील ३२८ बैलांच्या तुलनेत आज गावातील बैलसंख्या तब्बल २३८ ने घटली आहे.
यंत्रे वाढली अन् सर्जा-राजा कमी झाला
शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर व आधुनिक कृषी यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवण्याची आवश्यकता
भासत नाही. त्यातच चारा, देखभाल, औषधोपचार आणि पशुपालनाचा वाढता खर्च यामुळेही बैल पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
बैल केवळ शेतीचा साथीदार नव्हे
बैलांचे महत्त्व केवळ शेतीची कामे करण्यापुरते मर्यादित नाही. पशुधनापासून मिळणारे शेण हे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वाचे साधन आहे. शेणखतामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक वाढण्यास तसेच जमिनीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वाढता वापर, उत्पादन खर्चातील वाढ आणि जमिनीच्या सुपीकतेसमोरील आव्हाने पाहता सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व वाढत आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचे संवर्धन केल्यास शेणखताची उपलब्धता वाढून शाश्वत शेतीला आधार मिळू शकतो.
संख्या घटली, पण सर्जा-राजावरील प्रेम कायम
शेतीत यंत्रांचे महत्त्व वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या भावविश्वातील सर्जा-राजाचे स्थान आजही कायम आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या (Bullock Population Decline) बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी त्यांना सजवून, त्यांची पूजा करून शेतकरी आपली परंपरा जपत आहेत. भोरसा-भोरसी गावातही बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असली तरी बैलपोळ्याचा उत्साह कायम आहे. गावातील बैलांची मोजणीही याच पारंपरिक सणाच्या निमित्ताने करण्यात आली. त्यामुळे डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी सुरू केलेली ३६ वर्षांची नोंदणीची परंपरा त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या बंधूंनी पुढे नेल्याने या उपक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
“बैलांची संख्या आणखी कमी होऊ नये”
“गेल्या ३६ वर्षांपासून गावातील बैलसंख्येची नोंद (Bullock Population Decline) घेतली जात आहे. ही परंपरा माझे बंधू डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी सुरू केली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर यावर्षी बैलपोळ्याच्या निमित्ताने मी गावातील बैलांची मोजणी करून ही परंपरा पुढे सुरू ठेवली. नोंदी पाहिल्यास बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट दिसते. १९९९ मध्ये ३२८ असलेली संख्या आता ९० वर आली आहे. शेतीचे यांत्रिकीकरण आवश्यक असले तरी पारंपरिक पशुधनाचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. बैलांपासून मिळणारे शेणखत सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त असल्याने पशुपालनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे,” असे शेतकरी रविंद्र कृष्णराव भुसारी यांनी सांगितले.
भोरसा-भोरसी गावातील ३६ वर्षांची ही आकडेवारी केवळ बैलसंख्येतील घट दर्शविणारी नाही, तर बदलत्या ग्रामीण जीवनशैलीचे आणि शेतीच्या बदलत्या स्वरूपाचेही चित्र स्पष्ट करणारी आहे. यांत्रिकीकरण स्वीकारतानाच पारंपरिक पशुधनाचे संवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा आधार टिकविण्याचा समतोल साधणे ही काळाची गरज आहे.