कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाची शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा उत्साहात

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा प्रशिक्षण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाची शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा उत्साहात

Buldhana Agriculture

खरीप नियोजन व नव्या संधींवर सखोल मार्गदर्शन

बुलढाणा (Buldhana Agriculture) :
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा प्रशिक्षण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्यात थेट संवाद साधत शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, हवामान बदल आणि पूरक व्यवसायांच्या संधी यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपायुक्त पशुसंवर्धन अमितकुमार दुबे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख अमोल झापे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख दिनेश कानवडे, आशितोष लाटकर, विजय भुतेकर, स्वप्निल महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत आशितोष लाटकर यांनी आगामी हवामानाचा अंदाज, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि त्याचा खरीप पिकांवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक निवड, वेळेवर पेरणी, जलसंधारण आणि ताण सहन करणाऱ्या वाणांचा वापर याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

अमितकुमार दुबे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, अनुदानाच्या संधी आणि दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचे मार्ग स्पष्ट केले. त्यांनी शेतकऱ्यांना पशुपालनात आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी शेती व्यवसायातील नाविन्यपूर्ण संधी, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

अमोल झापे व दिनेश कानवडे यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय पद्धती, हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, तसेच हळद व शेवगा लागवडीच्या तांत्रिक बाबी यावर मार्गदर्शन केले. उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्यांवर प्रश्न उपस्थित केले असता तज्ज्ञांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली.

बैठकीदरम्यान शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मोहन जगताप व प्रकाश सपकाळ यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांनी मंचाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती व तंत्रज्ञान पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल तारू यांनी केले. प्रस्तावना व आभार प्रदर्शन करताना आयोजकांनी सर्व मान्यवर, अधिकारी आणि उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

‘भूमी सुपोषण व मृदा आरोग्य व्यवस्थापन’ विषयावर शेतकरी–शास्त्रज्ञ मंच यशस्वी

‘भूमी सुपोषण व मृदा आरोग्य व्यवस्थापन’ विषयावर शेतकरी–शास्त्रज्ञ मंच यशस्वी

Farmer-Scientist Forum: भूमी सुपोषण व मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर शेलगाव घुगे येथे शेतकरी–शास्त्रज्ञ मंचाचे यशस्वी आयोजन केले गेले. यामध्ये विविध तज्ञ उपस्थित होते.

Apr 07, 2026