बँक संप स्थगित

बँकांचा संप अखेर स्थगित झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा

Bank strike called off: बँक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला तीन दिवसीय देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे.

बँकांचा संप अखेर स्थगित झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा

Bank strike called off.

हिंगोली (Bank strike called off.) : बँक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला तीन दिवसीय देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या आणि पीक कर्ज वाटपाच्या हंगामात पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार होते, मात्र ऐनवेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर संप स्थगित झाल्याने हिंगोली जिल्ह्यासह देशभरातील लाखो खातेदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, पीएलआय योजनेत सुधारणा करावी यासह विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व राष्ट्रीयीकृत, खाजगी आणि ग्रामीण बँका बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. या तीन दिवसीय संपामुळे जिल्ह्यातील अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार होते. दसरा, दिवाळी सण तोंडावर असल्याने व्यापार्‍यांचे मोठे व्यवहार, नोकरदारांचे पगार, शेतकर्‍यांचे पीक कर्ज आणि शासकीय अनुदानाचे वाटप यावर थेट परिणाम होणार होता. एटीएममध्ये रोख रक्कम संपुष्टात येण्याची आणि चेक क्लिअरन्स ठप्प होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. 

मात्र या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री घडामोडींना वेग आला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम यांच्यात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. उर्वरित सर्व शनिवार सुट्टी जाहीर करून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आयबीए आणि यूएफबीयूची तातडीने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही समिती ग्राहक हिताला प्राधान्य देऊन सर्वमान्य तोडगा काढणार आहे.

त्याचबरोबर स्केल चार व त्यावरील अधिकार्‍यांच्या पीएलआय योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्यावर आणि आठ मार्च २०२४ च्या बैठकीतील इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे. या सकारात्मक चर्चेनंतर युनायटेड फोरमने २८ सप्टेंबर रोजी प्रस्तावित तीन दिवसीय संप आणि आंदोलनाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँकांचे कामकाज नियमित वेळेत सुरू होते संप स्थगित झाल्याच्या वृत्तामुळे बँक कर्मचार्‍यांसह व्यापारी आणि सामान्य खातेदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टैग्स: Bank strike called off